मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता भव्य गांधी, म्हणजेच सगळ्यांचा लाडका टप्पू, चर्चेत आला आहे. त्याचं मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताजी सोबत नाव जोडण्यात आलं आहे. दोघांच्या साखरपुड्याच्या अफवांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. मात्र अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भव्यने या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे.
भव्यने सांगितलं की, “वडोदरा येथे मी आणि मुनमुन साखरपुडा करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. ही पूर्णपणे अफवा होती. या बातमीमुळे माझ्या घरच्यांनाही अनेक फोन येऊ लागले. आई तर खूपच संतापली होती. ती लोकांना समजावत होती की असं काहीच घडलेलं नाही, तुम्ही काहीही बोलत आहात.”
या मुलाखतीत भव्यने मालिकेतील आपल्या सहकलाकारांचं कौतुकही केलं. दिशा वकानीबद्दल बोलताना तो म्हणाला, “ती खूपच छान व्यक्ती होती आणि सगळ्यांना हसवायची.” जेव्हा त्याला विचारण्यात आलं की त्याला पुन्हा शोमध्ये परत यायचं आहे का, तेव्हा तो हसत म्हणाला, “हो, नक्कीच. जर मी परत आलो, तर तो माझ्यासाठी खूप खास क्षण असेल.” त्याने पुढे सांगितलं की, “असित मोदी सर हे पहिले होते ज्यांनी माझ्यातील कलाकार ओळखला आणि मला इतकी मोठी संधी दिली.”
भव्यने २०१७ मध्ये ही मालिका सोडून चित्रपटसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनीही कौतुक केलं. अजून तो बॉलिवूडमध्ये दिसला नसला तरी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये त्याच्या पुनरागमनाच्या चर्चांना जोर चढला आहे. निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चाहत्यांना टप्पूला पुन्हा पाहण्याची इच्छा आहे.






