मुंबई : सध्या सोशल मीडियावर i-popstar या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणारा हा शो १८ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि परमिश वर्मा हे गायक या शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. या मंचावर मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये गाणी सादर करणारे स्पर्धक आपला वेगळा ठसा उमटवत आहेत.
या स्पर्धेत मराठमोळा गायक रोहित राऊत पुन्हा एकदा आपल्या दमदार परफॉर्मन्सने चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने i-popstar च्या मंचावर सादर केलेलं ‘रोअर ऑफ सह्याद्री’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेलं हे गाणं प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारलं आणि त्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
View this post on Instagram
या परफॉर्मन्सनंतर रोहितने सोशल मीडियावर काही खास पोस्ट शेअर केल्या. त्याने सांगितले की, या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्याने एक खास इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. या पोशाखाचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याच्या आजीच्या साडीपासून, म्हणजेच पातळापासून बनवलेला होता.
आपल्या पोस्टमध्ये रोहितने लिहिलं, “माझ्या आजीच्या पातळापासून तयार केलेला हा कॉस्ट्यूम माझ्यासाठी खूप आठवणींचा आणि जिव्हाळ्याचा आहे. त्या उबेसह मी आपल्या महाराजांवरील हे गाणं सादर केलं आणि तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी मी मनापासून आभारी आहे. हा कॉस्ट्यूम माझ्या टॅलेंटेड बहिणीने, किरणने तयार आणि डिझाइन केला आहे. तुमचं सर्वांचं असंच प्रेम माझ्यावर राहू दे, आणखी सुंदर गाणी लवकरच घेऊन येईन.”






