हाँगकाँग : पाकिस्तानने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने कुवेतवर मात करून हा किताब जिंकला. मात्र, विजयाऐवजी पाकिस्तानची टीम सोशल मीडियावर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्यासोबत असलेले अनुवादक (पीसीबीचे मीडिया अधिकारी) इंग्रजीत जे काही बोलले त्यावरुन ते चेष्टेचा विषय झाले आहे. खेळाडू आणि मीडिया अधिकारी या दोघांचे इंग्रजी अतिशय वाईट असल्याचे कार्यक्रमावेळी दिसून आले. आता याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Trust me he is the GM Media of PCB, currently serving as the team’s translator at the Hong Kong tournament. Ironically, his original posting was in the PCB archives department. I still remember once he accompanied a top Pakistan cricketer to a presentation ceremony. When they… pic.twitter.com/BzYpZ1fwoS
— Sanaullah Khan (@Sanaullahpaktv) November 9, 2025
सामन्याच्या कामगिरीकडे पाहिलं तर मोहम्मद शहजाद, अब्बास अफरीदी आणि अब्दुल समद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 52 धावा आणि 1 विकेट अशी दमदार कामगिरी करणाऱ्या अब्बास अफरीदीला सामनावीर घोषित करण्यात आलं. पाकिस्तानने हाँगकाँग सिक्सेसचा किताब सहाव्यांदा जिंकत इतिहास रचला. याआधी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने प्रत्येकी पाच वेळा हा किताब जिंकला होता. त्यामुळे सर्वाधिक वेळा हा किताब जिंकणारा देश म्हणून पाकिस्तानचं नाव नोंदवलं गेलं आहे.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत अवघ्या 6 षटकांत 135 धावा केल्या. कर्णधार अब्बास अफरीदीने केवळ 11 चेंडूत 52 धावा ठोकल्या, ज्यात 2 चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा समावेश होता. अब्दुल समदनेही 13 चेंडूत 42 धावांची झळाळती खेळी केली, तर ख्वाजा नफयने 6 चेंडूत 22 धावा केल्या.
कुवेतकडून मीत भावसारने सर्वाधिक तीन बळी घेतले. 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुवैतची सुरुवात चांगली झाली होती. अदनान इदरीस आणि मीत भावसार यांनी पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. इदरीसने 8 चेंडूत 30 धावा करत पाच षटकार ठोकले, तर भावसारने 12 चेंडूत 33 धावा केल्या. पण या दोघांच्या बाद झाल्यानंतर कुवैतची फलंदाजी कोसळली आणि संपूर्ण संघ 92 धावांवर गारद झाला.






