Monday, November 10, 2025

दिल्ली हादरताच मुंबईत 'हाय अलर्ट'! रात्रीची गस्त वाढवली; रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बाजारात कडक बंदोबस्त

दिल्ली हादरताच मुंबईत 'हाय अलर्ट'! रात्रीची गस्त वाढवली; रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बाजारात कडक बंदोबस्त

 लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर आठ ठार; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देशाचे लक्ष राजधानीकडे वेधले असतानाच, मुंबईत (Mumbai) तातडीने 'हाय अलर्ट' (High Alert) जारी करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या या भीषण स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मुंबईतील सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील या ऐतिहासिक परिसरामध्ये झालेल्या स्फोटामागे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED) वापरले असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ आणि घबराट पसरली. तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी पुरावे गोळा करण्यासाठी दाखल झाली आहेत. मध्य दिल्लीतील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

दिल्लीतील या मोठ्या घटनेनंतर, मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि इतर कायदा अंमलबजावणी संस्थांनी मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मुंबईसारखे मोठे आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर नेहमीच अतिदक्षतेखाली असते. "सध्या मुंबईला कोणताही थेट धोका नसला तरी, आम्ही कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही," अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी विशेषतः गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्टेशन्स, विमानतळे (Airports) आणि शहरातील महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे येथे सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व पोलीस युनिट्सना रात्रीची गस्त (Night Patrolling) आणि पाळत वाढवण्यास सांगण्यात आले आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि दिल्ली पोलिसांकडून इनपुट्स मिळवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे.

या स्फोटामुळे देशाच्या महत्त्वाच्या शहरांतील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या तयारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी शांत राहावे आणि अपुष्ट माहिती किंवा अफवा समाज माध्यमांवर (Social Media) पसरवू नयेत, असे आवाहन सुरक्षा अधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments
Add Comment