अमेरिकेत ट्रम्प यांच्या बडबडीमुळे जग त्रस्त असतानाच आता खुद्द अमेरिकेत गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे आणि अर्थात याच्याशी ट्रम्प यांचा थेट संबंध नाही. पण अमेरिकेच्या या संकटाचा परिणाम अमेरिकन नागरिकांना भोगावा लागत आहे. अमेरिकेत ७०० उड्डाणे रद्द झाली आहेत आणि हजारो नागरिक विमानतळांवर अडकून पडले आहेत. याला शटडाऊन असे म्हणतात. व्हर्जिनिया, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क तसेच वॉशिंग्टन आदी ठिकाणी विमानसेवा बंद असल्यामुळे एरवी प्रचंड गजबजाट असलेल्या ठिकाणी लोक भरकटताना पाहिले जात आहेत. सर्वच विमान कंपन्यांनी आपापल्या विमानसेवा पूर्णतः किंवा अंशतः बंद केल्या आहेत. विमानसेवा बंद केल्याचा फटका प्रवाशांना तर बसलाच आहे. अमेरिकेत साधारण २.५ ते ३ दशलक्ष प्रवासी दररोज विमानाने प्रवास करतात. अमेरिका सध्या तिहेरी आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे तेथे दीर्घ काळापासून सरकारी बंद, सरकारी कर्मचाऱ्यांची कपात आणि खाद्य सहाय्यतेत कपात यामुळे लोकांवर तिहेरी संकट ओढवले आहे. कॅपिटल एरिया फूड बँकेवर लोकांची गर्दी उसळली आहे आणि तरीही लोकांकडे खरेदीसाठी पैसा नाही. अमेरिकेचा कारभार ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याच वेळी सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चालाही कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना मिळणारे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर आहे आणि याचा परिणाम तेथील जनता आज भोगत आहे.
अमेरिकेत शटडाऊनमुळे संघीय कर्मचाऱ्यांना तात्पुरती रजा देण्यात आली आहे, तर काही कर्मचाऱ्यांना पगाराविना कामावर ठेवण्यात येत आहे. विमानतळावरील रडार केंद्रे आणि टॉवर यात कर्मचारी नसल्याने विमानसेवांना फटका बसला आहे. अमेरिकेत सर्वात मोठा शटडाऊन करण्यात आला असून त्यामुळे विमान उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली आहे. अर्थात या शटडाऊनमागे अमेरिकन काँग्रेसमध्ये खर्च आणि निधीच्या विधेयकांवर सहमती न होणे आणि त्यामुळे सरकारी कामकाज थांबले, याचे आर्थिक परिणाम म्हणजे सरकारी सेवा खंडित होणे हाच अटळ असतो. तसेच यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर परिणाम होतो. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षात असलेले मतभेद यासाठी कारण आहेत. या शटडाऊनमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थांबते आणि तेच अमेरिका सध्या पाहत आहे. यामुळे दररोज अमेरिकेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत आहे. विमान उड्डाणे बंद पडली हा एक या शटडाऊनचा तात्कालिक परिणाम आहे. खरा परिणाम तर आर्थिक आहे. अमेरिकन सरकारला निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सिनेटने फेटाळला आणि इथून अमेरिकेचा पेच सुरू झाला. पगार न मिळालेल्या कर्मचाऱ्यांकडून सेवा दिली जात नाही आणि त्यामुळे असे शटडाऊन अमेरिकेत होतात.
अमेरिकेसारख्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली आणि प्रचंड देशात शट डाऊनसारखा पेच प्रसंग उभा राहिल्याने सर्व जगाच्या भुवया उंचावल्या आहेत, यात काही शंका नाही. या शटडाऊनमुळे अमेरिकेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पेंचप्रसंग उभा राहिला आहे ही जास्त गंभीर बाब आहे. मूळ कारण असे होते की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य सेवांवरील खर्च कमी करण्यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. पण ते विधेयक नामंजूर झाले आणि इथपासून हा पेंच सुरू झाला. सरकारी योजनांसाठी दिला जाणारा निधीही कमी करण्याचा ट्रम्प प्रशासनाने घाट घातला होता. पण तो ठराव बारगळल्याने अमेरिकवर संकट ओढवले आहे. विमानसेवा जशा ठप्प झाल्या तसेच अनेक सरकारी विभाग बंद होण्याचा धोका आहे. अर्थात यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराविना काम करावे लागत आहे. अमेरिकन सरकारमध्ये शटडाऊन झाल्यामुळे सरकारी सेवा ठप्प झाल्या आहेत आणि त्याचा व्यावसायिक विश्वास आणि गुंतवणुकीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विलबिंत आर्थिक विदा म्हणजे डेटा रिलीज होण्यास विलंब होतो. त्यामुळे धोरणकर्त्यांना निर्णय घेण्यास अपरिहार्य आहे, प्रत्येक वेळेस शटडाऊन जीडीपी वाढीवर १५ अब्ज म्हणजे ०.१ ते ०.२ टक्के परिणाम करतो. त्यामुळे तितक्या प्रमाणात सरकारी क्रियाकलाप थंडावतात आणि त्याचा परिणाम खासगी गुंतवणुकीवरही होतो. त्यामुळे प्रकल्प बंद पडतात किंवा पुढे ढकलले जातात. हे सर्व परिणाम अमेरिकेच्या शटडाऊनमुळे झाले आहेत आणि होणार आहेत. या शटडाऊनचा दुष्परिणाम म्हणजे ग्राहकांच्या खर्चावर परिणाम होऊन ते हात आखडता घेतात. उत्पादकता कमी होते. अमेरिकेत जेथे दररोज शेकडो विमान उड्डाणे होतात आणि न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को विमानतळ जास्तीत जास्त गर्दीने गजबजलेला असतो तेथे आज प्रवासी फक्त विमानांच्या शोधात इतरत्र भटकताना दिसत आहेत. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशासाठी हे चित्र चांगले नाही.
अर्थात हा शटडाऊन राजकारणापासून अलिप्त नाही. डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन हे दोन्ही प्रमुख पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. काँग्रेस आवश्यक साधारण सरकारी खर्चासाठी निधी देण्यात अपयशी ठरली आणि याचा मुख्य केद्रबिंदू हा अमेरिकेच्या आरोग्य खर्चाभोवती आहे. डेमोक्रेट्स आग्रहपूर्वक सांगत आहेत की एक वर्षाचा सध्याच्या अफोर्डेबल केअर अॅक्टला कालावधी वाढवून द्यावा; परंतु सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने हा प्रस्ताव हाणून पाडला आणि त्यामुळे अमेरिकेत शटडाऊनचे संकट ओढवले. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी डेमोक्रेट्स सिनेटने मंजूर केलेले विधेयक अडवून ठेवले आहे, असा आरोप केला आहे. तर डेमोक्रेट्सने असा आरोप केला आहे की, कपात प्रस्तावाना ट्रम्प प्रशासनाने पुढावा देण्यासाठी चांगल्या वाटाघाटी केल्याच नाहीत. परिणामी अमेरिका आज आर्थिक संकटात सापडली आहे. शटडाऊन सुरूच राहिला, तर अमेरिकन हवाई प्रवासात कपात वाढू शकते. अमेरिकेत हजारो विद्यार्थी आणि व्यावसायिक आहेत. त्यांना याचा फटका बसू शकतो. तसेच अमेरिकेला लाखो डॉलर्सचे नुकसान सोसावे लागत आहे. ट्रम्प याच्या अडेलततट्टू आणि हट्टी कारभाराला हे चपखल उत्तर आहे असेच म्हणावे लागेल.