रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानचे हे मोठे काम आहे, असे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले.
मंत्री राणे यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी, म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नितेश राणे म्हणाले, अतिशय शिस्तबद्ध असलेला हा कार्यक्रम मनाला स्पर्श करणारा होता. या गावाला भेट देणाऱ्या लोकांसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल. त्याशिवाय समितीचे अनेक उपक्रम चांगले आहेत. कोकणात स्त्रीशक्ती प्रबळ असताना ती भक्कम बनविण्याची मोठे काम राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान या उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला, माता भगीनींचे योगदान मोठे आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्गमधे एकूण लोकसंख्येमध्ये ६२ टक्के महिला आहेत. त्यांना सक्षम करणे आणि त्यातून कोकणचा विकास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अलौकिक इतिहासाचे स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणे म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे, असेही राणे म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. पद्मजा अभ्यंकर यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती देतानाच शिक्षण आणि ध्येयपूर्ती हे जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट असून त्यातूनच राष्ट्र आणि धर्माचा विचार केला पाहिजे, यासाठी कुटुंबातील संवाद वाढवणे आणि त्यात देश व समाजाच्या ऋणांविषयी बोलणे गरजेचे आहे, असे सांगितले.
कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. उमा दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा दक्षिण रत्नागिरी कार्यवाहिका सौ. मीरा भिडे यांनी पाहुण्यांच्या परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते अनेकांचा सन्मान करण्यात आला. कुर्धे शाळेतील विद्यार्थिनींची डंबेल्स प्रात्यक्षिके, जिजामाता शाखेतील सेविकांची योगचाप म्हणजेच लेझीमचे प्रात्यक्षिके, दंडांचे प्रात्यक्षिके, घोषवादन, गणेशगुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत आदी कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमाला माजी सरपंच सौ. श्रावणी विक्रांत रांगणकर, रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. दीपा पाटकर, उपस्थित होत्या. समिती शाखेच्या वतीने ध्वजारोहण, घोषवादन, प्रार्थना, ध्वजावतरण, शिवस्तुती पठण आदी कार्यक्रम झाले.






