या प्रकल्पामुळे बलोतरा आणि पाचपद्रा परिसराचा चेहरामोहरा बदलला
सीमा पवार बाडमेर : हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स (एचपीसीएल) आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्थानातील बाडमेर जवळ पाचपद्रा येथे अत्याधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. ४ हजार ८०० एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
बाडमेर जिल्ह्यातील पाचपद्रा येथे उभारण्यात येत असलेला एचपीसीएलचा राजस्थान रिफायनरी लिमिटेड (एचआरआरएल) हा देशातील पहिला अत्याधुनिक आणि भव्य तेल शुद्धीकरण प्रकल्प ठरणार आहे. ७८ हजार ४७९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात भारत सरकारची अंगीकृत असलेल्या एचपीसीएल कंपनीची ७४ टक्के तर राजस्थान सरकारची २६ टक्के भागीदारी आहे. या प्रकल्पामुळे ३५ हजार लोकांना थेट तर एक लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमता ९ दशलक्ष मेट्रिक टन आहे. येथे बीएस-६ दर्जाचे पेट्रोल आणि डिझेल त्याचबरोबर नाफ्ता, प्लास्टिक व इतर पेट्रोकेमिकल पदार्थांची निर्मिती केली जाणार आहे. राजस्थानच्या औद्योगिक इतिहासातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून भविष्यात हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प ठरणार आहे. प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक नियंत्रण व्यवस्था विकसित करण्यात आली असून सुरक्षेच्या सर्व निकषांसह येथे काम केले जात आहे. वाळवंटातील रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HRRL रिफायनरीमध्ये आयातित कच्च्या तेलासह राजस्थान कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची कल्पना आहे. डिझाइन क्रूड मिक्स राजस्थान क्रूडचे १.५ MMTPA + आयातित कच्च्या तेलाचे ७.५ MMTPA आहे आणि रिफायनरी १००% आयातित कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी देखील डिझाइन केलेली आहे. या प्रकल्पामुळे राजस्थानात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असून स्थानिक उद्योग, वाहतूक आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे.






