अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. टॅरिफ धोरणावरून देशात विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली असली, तरी ट्रम्प यांनी लोकांसाठी ‘टॅरिफ फंड’ नावाची नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या खात्यात जवळपास $2,000 म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1.8 लाख रुपये जमा केले जाणार आहेत. ट्रम्प यांनी ही घोषणा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वरून केली.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रशासनामुळे अमेरिका आज जगातील सर्वात श्रीमंत आणि आदरणीय देश बनला आहे. त्यांनी सांगितले की, देशात महागाई जवळजवळ नाही आणि शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेला टॅरिफमधून ट्रिलियन डॉलर्सचा महसूल मिळत आहे आणि या रकमेचा वापर देशाचे $37 ट्रिलियन कर्ज फेडण्यासाठी केला जाईल.
यूएस ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी यापूर्वी सांगितले होते की, सरकारचे मुख्य लक्ष टॅरिफच्या उत्पन्नातून राष्ट्रीय कर्ज कमी करण्यावर आहे.
भारताशी तुलना करताना ट्रम्प यांची ही योजना थोडी वेगळी पण ओळखीची वाटते. भारतात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजना तसेच केंद्राची ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजना राबवली जाते, ज्यांत थेट आर्थिक मदत नागरिकांच्या खात्यात दिली जाते. त्याच धर्तीवर ट्रम्प आता अमेरिकन नागरिकांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याच्या तयारीत आहेत.