Sunday, November 9, 2025

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार

मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने पुन्हा एकदा या १२६ किमी लांबीच्या रस्ते प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच लवकरच टेंडर मागवले जाणार आहे. गेल्या महिन्यात, प्रोजेक्टचा पहिला टप्पा बील्ड ऑपरेट अॅण्ड ट्रान्सफर (बीओटी) अंतर्गत बांधण्याच्या एमएसआरडीसीच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर, महामंडळाकडून कामाला सुरूवात करण्यात आली होती.

प्रवास अवघ्या दीड तासांत पूर्ण होणार

बीओटी अंतर्गत असणाऱ्या या प्रोजेक्टच्या कामासाठी महामंडळाने सरकरकडे रिपोर्ट्स पाठवले आहेत. या रिपोर्टला मंजूरी मिळताच, विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी बीओटी सिस्टिमचा वापर करून टेंडर मागवले जातील. या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे विरार आणि अलिबागमधील ४ तासांचा प्रवास केवळ ९० मिनिटांत म्हणजेच दीड तासात पूर्ण होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, टोलमधून प्रकल्पाचा खर्च वसूल झाल्यानंतर रस्ता सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे.

प्रकल्प बीओटी तत्त्वावर

२०१६ मध्ये पहिल्यांदा या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. यासाठी बऱ्याचदा निविदा मागवण्यात आल्या होत्या, परंतु कोणत्याही कंपन्यांनी यामध्ये रस दाखवला नाही. काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या टेंडरवर कंपन्यांनी ३६ टक्क्यांपेक्षा अधिक बोली लावली होती.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी, एमएसआरडीसीने हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारने बँक हमी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. ही रक्कम प्रोजेक्टसाठी जमीन मिळवण्यासाठी खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दोन टप्प्यांमध्ये कॉरिडोर

१२६ किमी लांब कॉरिडोरची दोन टप्प्यांमध्ये निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत, पालघरच्या नवघर येथून पेणच्या बलावली दरम्यान ९६,४१० किमी लांबीचा मार्ग बनणार आहे. हा मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर, एमएमआरच्या कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग एनपीटी, नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा हायवे, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतूशी कनेक्ट केला जाणार आहे.

Comments
Add Comment