Saturday, November 8, 2025

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विद्युत पुरवठा सुरुळीत राहावा याकरता डिझेलवर आधारीत जनरेटर बसवले आहे. परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सेवा सुरु व्हायला काही सेकंदाचा अवधी जातो. मात्र, प्रसूतीगृहांमध्ये शस्त्रक्रिया गृहात अर्थात ऑपरेशन थिएटरमध्ये अशाप्रकारे विद्युत पुरवठा खंडित होवून काही सेकंदांमध्ये सुरु होणे ही बाब योग्य नसल्याने याठिकाणी अखंडित सेवा सुरु राहावी याकरता सर्व प्रसूतीगृहांमध्ये युपीएस सेट बसवला जाणार आहे. ज्यामुळे आता प्रसूतीगृहांमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काही सेकंदाकरताही विद्युत पुरवठा खंडित होणार नाही. मुंबई महापालिकेच्या माहिम प्रसूतीगृह, नायगांव प्रसूतीगृह, हाजी मोहम्मद हाजी साबू सिद्‌द‌की प्रसूतीगृह, प्रभादेवी सुर्यकांत वगळ प्रसूतीगृह, कान-नाक-घसा रुग्णालय, रावळी प्रसूतिगृह इत्यादी प्रसूतीगृहे आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास, आपत्कालीन परिस्थितीमध्ये या प्रसूतिगृहाचा विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी, रावळी कॅम्प प्रसूतिगृह वगळता, इतर प्रसूतिगृहामध्ये डिझेल जनरेटरची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच रावळी कॅम्प प्रसूतिगृह येथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यास प्रसूतिगृहामध्ये डिझेल जनरेटर उपलब्ध नसल्याने, सदर ठिकाणी डिझेल जनरेटर संच बसवण्यात येणार आहे. मात्र, यासर्व सर्व प्रसूतीगृहामध्ये, ऑपरेशन थिएटर आणि रिकव्हरी रुमला युपीएस यंत्राचा विद्युत बॅक अप उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या विद्युत पुरवठा खंडित झाल्यास काही सेकंदाने पर्यायी विजेचा पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे किमान ऑपरेशन थिएटर आणि रिकव्हरी रुमला विद्युत बॅक अपकरता युपीएस यंत्रणा बसवण्याची मागणी वैद्यकीय अधिका-यांकडून होत होती. त्यानुसार आता यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने यासर्व प्रसूतीगृहांमधील ऑपरेशन थिएटर आणि रिकव्हरी रुमला युपीएस यंत्राच बसवण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या यंत्राचा वापर केल्यामुळे अखंडित विद्युत पुरवठा हा ऑपरेशन थिएटरमध्ये होईल आणि यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामांमध्येही व्यत्यय तथा त्यांचे मन विचलित होणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रावळी वगळता इतर प्रसूतीगृहांमध्ये डिझेल जनरेटर बसवण्यात आल्याने याची वार्षिक देखभाल आणि इतर स्वरुपाची कामे करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment