Sunday, November 9, 2025

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबईत एकनाथ शिंदेंनी मनसेला धक्का दिला आहे. मनसेचे माजी उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेउलकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. प्रीतम चेउलकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांचं काम पाहून शिवसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रीतम चेउलकर यांनी सांगितले.

मनसेमध्ये जे काही सुरू आहे त्यातल्या अनेक गोष्टींविषयी तक्रारी केल्या. पण फरक पडला नाही. अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन राजीनामा दिला. पदाचा राजीनामा दीड महिन्यापूर्वी दिला होता. मनसे या पक्षाचा राजीनामा देऊन आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्रीतम चेउलकर यांनी दिली.

मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पक्षात मंगेश कुडाळकर यांनी स्वागत केले. एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा असे निर्देश मंगेश कुडाळकर यांनी दिले. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आणि तो मराठीच होणार असं भाकीत शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांनी केले.

Comments
Add Comment