Friday, November 7, 2025

पार्थ पवार प्रकरणात काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

पार्थ पवार प्रकरणात काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय ? असे विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसमोर त्यांची भूमिका जाहीर केली.

'एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात कंपनीच्या सिग्नेटरीवर एफआयआर दाखल होतो. ज्यांनी सही केली, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते अशा सर्वांवर हा एफआरआय दाखल झाला आहे. चौकशी दरम्यान अजून कुणाची नावे आली तर त्यांच्यावर ही कारवाई होत असते. आता कारवाई केली मध्ये कुणालाही डावलले नाही. नियमानुसार, सही केलेले, पावर ऑफ अटर्नी हे एफआयआरचे जबाबदार असतात त्यांना जबाबदार धरलेलं आहे. ज्या कराराची चर्चा होत आहे त्या करारामध्ये पैशांचा व्यवहार बाकी होता. पण रजिस्ट्रेशन झालं होतं. आता दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी, असा अर्ज केलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना पैसे भरावे लागतात. त्या संदर्भातील नोटीस जारी झाली आहे. त्यामुळे पुढची कारवाई जी आहे ती होईल. पण हे जरी झालं तरीदेखील जी क्रिमिनल केस दाखल झाली आहे ती संपणार नाही. या प्रकरणात जी अनियमितता आहे, त्याला जो कुणी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल'; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'एक समांतर चौकशी सुरू आहे. त्या अंतर्गत समिती एक महिन्यात अहवाल देणार आहे. या प्रकरणाची किती व्याप्ती आहे, या प्रकरणात अजून कोण कोण आहे या संदर्भात माहिती मिळेल. त्या आधारावर पुढील कारवाई होईल. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन जणांना अटक केली आहे. सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल. कुठल्याही पद्धतीने कुणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही. हा संपूर्ण जो घटनाक्रम समोर येत आहे त्याच्या तळाशी जाण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होईल'; असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment