पाचवा वेद - भालचंद्र कुबल हल्ली पाचवा वेद छापून आला आणि तो समाज माध्यमातून व्हायरल झाला की फोन यायला सुरुवात होते. माझ्या सोशल मिडीया मॅनेजरच्या कॅलक्युलेशननुसार अंदाज पन्नास हजारांपेक्षा अधिक वाचकांपर्यंत पाचवा वेद पोहोचतो आणि हा आकडा खरा आहे याची सत्यता मी पडताळून पाहिली आहे. त्यामुळे परिणाम स्वरूपी त्याबाबत प्रतिक्रिया उमटणं अगदी अपरिहार्य आहेत. कधी-कधी विचार येतो एखाद्या वृत्तपत्राच्या सर्क्युलेशनपेक्षा किंवा प्रिंट ऑर्डरपेक्षा आपल्या लेखाचा ‘रिच’ ही जरी कौतुकास्पद गोष्ट असली तरी मुलतः ‘प्रहार’ आहे म्हणून माझे लिखाण आहे, त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून सोशल मिडीया आहे. म्हणूनच पाचव्या वेदाचे वितरण आहे. त्या अानुषंगाने येणाऱ्या कमेंट्स विविध स्वरूपाच्या असतात. काही सकारात्मक काही नकारात्मक काही प्रक्षोभक काही दुर्लक्षित अशा नानाविध प्रकारांनी प्रेरीत असलेल्या कमेंट्सचे बुके शनिवारी रविवारीच नव्हे, तर पुढल्या आठवड्याभराची बेगमी करून देतात. अशीच एक प्रतिक्रिया मागच्या आठवड्यातील राज्यनाट्य स्पर्धेत लेखकांनी लिहिलेल्या नाटकांबाबत दखल घेणाऱ्या अभिजित झुंजाररावची होती. प्रतिक्रिया छोटीशीच होती परंतु ‘उपेक्षित’ या शब्दप्रयोगाशी संबंधित होती. राज्यनाट्य स्पर्धेला एका स्तरावर नेऊन ठेवण्याची कामगिरी फक्त लेखकांनीच केली आहे का? राज्यनाट्य स्पर्धेत दिग्दर्शकांचे काहीच योगदान नव्हते का? मग उपेक्षित म्हणून तुम्ही त्यांचीच बाजू घेणार का...? प्रश्न रास्त होते...! म्हणून दिग्दर्शकीय आढावा घेतला जावा या हेतूने केल्या जाणाऱ्या उहापोहाची ही प्रस्तावना समजावी.
दिग्दर्शक कोणाला म्हणावे? तर दिक् म्हणजे दिशा आणि त्याचे दर्शन घडवतो दिग्दर्शक ही रुढार्थाने ठरून गेलेली व्याख्या इथे विचारात घेऊ. नाटकाचा दिग्दर्शक हा नाटकाची कलात्मक दृष्टी ठरवणारा मुख्य व्यक्ती असतो. तो नाटककाराचे शब्द रंगमंचावर जिवंत करतो आणि त्यासाठी अभिनेता, नेपथ्यकार, वेशभूषाकार, संगीतकार आणि प्रकाश योजनाकार अशा सर्व कलाकारांच्या चमूचे नेतृत्व करतो. दिग्दर्शक नाटकाची संकल्पना ठरवतो, त्यातील पात्र आणि प्रसंगांचे अर्थ लावतो, आणि निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवतो. दिग्दर्शन ही एक कला आहे जी नाट्य आणि नाट्यप्रयोगाच्या विकासाचा विकास आहे. नाट्यक्षेत्र नवीन ट्रेंड्सच्या उदयात नवी शिखरेही स्वीकारीत आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नाटकाचे स्पष्टीकरण एका कामाचे केंद्र बनले होते. दिग्दर्शन हे एक काम (नाट्यकार्य) म्हणून गणले गेले. सापेक्षतावाद आणि मनोविश्लेषणात्मक सिद्धांताने पीटर ब्रूक, इंगमार बर्गमन, पीटर हॉल यांसारख्या नावीन्यपूर्ण दिग्दर्शकांच्या कामावर नाट्य अभ्यासकांकडून प्रकाश पाडला गेला. पीटर स्टीन आणि ज्योर्जियो स्ट्रेहलर यांच्या नावीन्यपूर्ण आणि आताच्या संज्ञेनुसार प्रायोगिक समजल्या जाणाऱ्या कामावर चर्चा घडून आणि नियम बनून दिग्दर्शकीय भूमिकेची रचना पक्की केली गेली. या संदर्भांचा आणि राज्यनाट्य स्पर्धेतील दिग्दर्शकांचा किंवा केवळ दिग्दर्शक या अभिव्यक्तीचा थेट संबंध नसला तरी तो मूलभूत विचार म्हणून मांडणे गरजेचे आहे. दिग्दर्शक संहितेचा विचार करून नाटकाचा अर्थ उलगडतो आणि त्याला रंगमंचावर जिवंत करतो. यात तो संहिता वाचून त्यातील मूळ कल्पनेचा अर्थ समजून घेतो. त्यानंतर, तो नाटकातील संवाद, दृश्ये, पात्रे, संगीत आणि ध्वनी यांसारख्या घटकांना एकत्र करून आपल्या कल्पनाशक्तीनुसार नाटकाचा 'प्रयोग' तयार करतो. दिग्दर्शक संहितेच्या अनेक शक्यतांचा शोध घेतो आणि कलाकारांना आपल्या दृष्टिकोनानुसार अभिनय करण्यासाठी मार्गदर्शन करतो, ज्यामुळे एकाच संहितेतून अनेक वेगवेगळे प्रयोग साकार होऊ शकतात. संहितेचा विचार करण्याची प्रक्रिया ही दिग्दर्शकीय जबाबदारी असते असे मी मानतो.
गझल... म्हणजे नुसते शब्द नव्हेत, ती आहे प्रत्येक भावना शब्दांत गुंफण्याची कला! विरह, प्रेम, जीवन आणि आत्मचिंतन यांना सुरांनी दिलेले एक हळुवार आलिंगन ...
संहितेचे विश्लेषण म्हणजे काय आणि ते कसे करावे, तर दिग्दर्शक प्रथम संपूर्ण संहिता काळजीपूर्वक वाचतो. तो कथेचा विषय, पार्श्वभूमी, पात्रांचे नातेसंबंध आणि नाटकाचा एकूण संदेश समजून घेतो. संहिता वाचल्यानंतर, दिग्दर्शक एक कलात्मक दृष्टिकोन तयार करतो. हे नाटकाला कशा प्रकारे सादर करायचे, याबद्दलची एक दृष्टी असते, ज्यात रंगमंच, वेशभूषा आणि प्रकाशयोजना यांचा विचार केला जातो. प्रत्येक पात्राची पार्श्वभूमी, त्यांचे हेतू आणि भावना यांचा सखोल अभ्यास केला जातो. यातून पात्रांना अधिक वास्तववादी बनवण्यासाठी मदत होते. संवादांचे अर्थ आणि कृती यांच्यातील संबंधांवर लक्ष केंद्रित केले जाते. संवाद कसे सादर करायचे, याचा विचार केला जातो, जेणेकरून ते पात्राच्या भावना आणि विचार प्रभावीपणे व्यक्त करतील. दिग्दर्शक रंगमंचाची मांडणी, प्रकाशयोजना आणि इतर तांत्रिक बाबींचा विचार करतो. हे सर्व घटक नाटकाच्या एकूण अनुभवाला पूरक ठरतील याची खात्री केली जाते. दिग्दर्शक नटांना त्यांची पात्रे आणि संवादांची मांडणी कशी करायची, याबद्दल मार्गदर्शन करतो. यात नटांच्या नैसर्गिकतेवर लक्ष केंद्रित केले जाते, जेणेकरून ते त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांना एक प्रभावी अनुभव देऊ शकतील. दिग्दर्शक संहिता, नट, तांत्रिक गट आणि इतर सर्व घटकांमध्ये एकसंधता आणि समन्वय साधतो. यातून एक सुसंगत आणि प्रभावी नाट्यप्रयोग सादर केला जातो. आता मला सांगा एवढ्या मोठ्या शिपचा कॅप्टन ज्यावेळी उपेक्षित ठरतो त्यावेळी त्या गोष्टींची कारणमिमांसा शोधणे मला गरजेचे वाटू लागते. राज्यनाट्य स्पर्धेचा दिग्दर्शकीय आढावा आणि त्याचा कॅनव्हास फार मोठा आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर, दिलिप कोल्हटकर, पुरुषोत्तम बेर्डे, विनय आपटे, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी ते आत्ता आत्ताच्या संतोष पवार, अभिजित झुंजारराव, संतोष वेरुळकर यांच्यासारखे दिग्गज राज्यनाट्य स्पर्धेतूनच मिळाले. मात्र त्यांच्या एस्टॅब्लिशमेंटचा काळ हा त्यांच्यासाठी उपेक्षित होता. त्यावर कधीच कुणी लिहिणे सोडा बोललेलंही नाही. सामान्य वाचकाला किंवा प्रेक्षकाला दिग्दर्शकाच्या कार्याची सुतराम कल्पना नसते. आताचे नाटक तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या नटांभोवतीच फिरते. दिग्दर्शक क्या क्या पापड बेलता है आणि तरीही उपेक्षित म्हणून समजला जातो याचा प्रत्यक्ष चर्चिक आढावा पुढल्या लेखात नक्कीच वाचू...!





