Friday, November 28, 2025

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील ‘असंभव’ या चित्रपटातून पहिल्यांदाच तिहेरी भूमिकेत झळकणार असून निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता या तिन्ही जबाबदाऱ्याही तो एकाचवेळी सांभाळत आहे.

साडे माडे तीन, क्षणभर विश्रांती, झेंडा, अर्जुन, क्लासमेट्स, फ्रेंड्ससारख्या चित्रपटांमधून तसेच राधा प्रेम रंगी रंगली आणि अबोली या मालिकांमधून सचितने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. त्यापूर्वी साडे माडे तीन आणि क्षणभर विश्रांती या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्याने आपल्या सर्वगुणसंपन्नतेचीही पावती दिलेली आहे. आता ‘असंभव’मधून तो एका नव्या रूपात, नव्या जबाबदारीत आणि नव्या आव्हानासह परतला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.

आपल्या या अनुभवाबद्दल सचित पाटील म्हणतो, “एकाच वेळी निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही भूमिका निभावणं, ही माझ्या आयुष्यातली मोठी परीक्षा होती. ज्यावेळी कपिल भोपटकर यांनी ही कथा मला ऐकवली, त्याक्षणी हा चित्रपट पडद्यावर आणणं हाच माझा ध्यास बनला. तिहेरी भूमिकेतील प्रत्येक जबाबदारी एकमेकांपेक्षा वेगळी आहे. या जबाबदाऱ्या साकारताना मी स्वतःलाही नव्यानं शोधलं. ही संपूर्ण प्रक्रिया मला सकारात्मक अनुभव देणारी होती आणि या सगळ्या प्रवासात मला मोलाची साथ लाभली ती माझ्या जीवलग मित्राची म्हणजेच नितीन प्रकाश वैद्यची. त्याने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच मी या तिहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकलो आणि आम्ही दोघं मिळून मुंबई-पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटची स्थापना करू शकलो. माझ्या टीमचा माझ्यावरील विश्वास, त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच ‘असंभव’चा हा प्रवास शक्य झाला. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवेल.”

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी तर सह दिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं आहे. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गाठींच्या थरारात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा