Saturday, November 8, 2025

देशातील नोटबंदी

देशातील नोटबंदी
रवींद्र तांबे भारत देशामध्ये आतापर्यंत पाचवेळा नोटबंदी करण्यात आली. देशामध्ये नोटबंदी ही बेकायदेशीर नसली तरी देशात भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांच्यात चर्चा होऊन देशात नोटबंदी केली जाते. तेव्हा देशात आतापर्यंत केव्हा नोटबंदी करण्यात आली, त्याविषयी माहिती जाणून घेऊया. जेणेकरून देशातील सर्वसाधारण नागरिकाला नोटबंदी म्हणजे काय हे जाणून घेऊ. तसेच सरकारने आतापर्यंत ज्या ज्या वेळी देशात नोटबंदी केली त्या काळात काळा पैसा चलनातून नष्ट करणे व बनावट नोटांना आळा घालणे ही नोटबंदीची प्रमुख उद्दिष्टे होती. भारत देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी, रोख स्वरूपात होणाऱ्या बेहिशेबी व्यवहाराला आणि कर चुकवण्यावर आळा बसण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता नोटबंदीची घोषणा केली. नोटबंदीला आज नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्काळ नोटबंदीचा निर्णय घेतल्यामुळे नोट बदलण्यासाठी बँकेच्या बाहेर लांब रांगेत उभे राहण्याची लोकांवर वेळ आली. तसेच एटीएममध्ये खडखडाट झाल्याने स्वत:चे पैसे असून सुद्धा पैसे मिळत नसल्यामुळे लोक चिंताग्रस्त होऊ लागले. सन २०१८ च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार रुपये १५.४१ लाख कोटींच्या नोटा सरकारी तिजोरीत जमा झाल्या तरी अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात महात्मा गांधींचा फोटो असणारी रुपये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्याची नवीन घोषणा केली. मात्र भारतीय रिजर्व्ह बँक ऑफ इंडियांनी १९ मे, २०२३ रोजी २००० रुपयांची नोट बंद केली. यामुळे नोटा बदलण्यासाठी बँकांच्या बाहेर रांगा लागू लागल्या. म्हणजे मागील नऊ वर्षांत नेमके काय साध्य केले याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला आर्थिक फायदा किती झाला हे सहज समजेल. त्यासाठी प्रत्येकांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. काळा पैसा, बनावट पैसा आणि करचुकवेगिरी रोखण्यासाठी आपला देश स्वातंत्र्यापूर्वी १२ जानेवारी १९४६ रोजी ब्रिटिश सरकारच्या कार्यकाळात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांनी ५००, १,००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा चलनामधून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९५४ साली पुन्हा ५००, १,००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा चलनामध्ये आणण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर काळाबाजार रोखणे हा यामागील मुख्य उद्देश होता. सन १९७० मध्ये भारताचे माजी सरन्यायाधीश कैलाश वांचू यांच्या नेतृत्वाखाली काळ्या पैशाला आळा बसण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली. १६ जानेवारी, १९७८ रोजी देशाचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (जनता पक्षाचे आघाडी सरकार) यांच्या सरकारने रुपये १,०००, रुपये ५,००० आणि रुपये १०,००० च्या नोट भारतीय चलनातून रद्द केल्या. त्यामुळे देशातील नोटाबंदीमुळे आपण काय कमावले आणि काय गमावली याचा विचार आपण सर्वांनी आजच्या दिनी करणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट करीत असताना आपली दूरदृष्टी असते. ती सफल झाली का? याचा सुद्धा विचारविनिमय व्हायला हवा. तसेच देशपातळीवर काम करीत असताना देशातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काम करणे गरजेचे असते. नोटबंदीमुळे लागलीच रोख रकमेचा तुटवडा जाणवतो. बँकेत पैसे काढण्यावर बंदने घालण्यात येतात. यामुळे देशातील गरीब नागरिकांना जास्त त्रास होतो. मात्र नोटबंदीची वेळ येऊ नये म्हणून ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. देशातील नोटबंदीचा विचार करता, देशातील काळा पैसा नष्ट करणे, बनावट चलनी नोट आणि कर चुकवेगिरीवर नियंत्रण ठेवणे अथवा आळा घालणे होय. बऱ्याच वेळा काळा धन म्हणतो मात्र सातासमुद्रापार गेल्याने जुन्या नोटाच बँकेत जमा होताना दिसतात. नोटबंदीमुळे बँक व्यवहारांना मर्यादा आल्याने डिजिटल व्यवहारामुळे हे शक्य झाल्याचे बोलले जाते. यामुळे बँकेतील डिजिटल व्यवहारामध्ये वाढ झाल्याने बँकेतील आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन मिळते. बँकांमध्ये सुद्धा पैसा जमा होतो. बँकिंग व्यवहारामध्ये वाढ झाल्याने सरकारी महसूल वाढण्याला मदत होते. याचा परिणाम कर चुकवेगिरीला आळा बसून आर्थिक विषमता कमी होण्याला मदत होते. असे जरी असले तरी काळा पैसा जमा करणे एक आवाहन असते. तेव्हा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करीत असताना यातून मिळणारा पैसा देशाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी अगोदर निर्बंध घालणे गरजेचे आहे. तसेच बनावट चलनावर नियंत्रण असायला हवे. तेव्हा देशात नोटबंदी जरी करण्यात आली तरी देशात नोटबंदी करण्याची वेळ सरकारवर का आली याचा लोकशाहीप्रधान देशातील नागरिकांनी गांभीर्याने अभ्यास करणे गरजेचे आहे. नोटबंदीमुळे देशातील सर्वसाधारण नागरिकांचे कसे हाल होतात हे मी स्वत: पाहिले आहे. पाचशेच्या दोन नोटा बँकेत बदलताना जवळ जवळ दोन तास मला रांगेत उभे राहावे लागले होते. काही प्राध्यापक मंडळी कोर्ससाठी मुंबईमध्ये आली होती. त्यांच्या जवळ पाचशेची नोट होती. मात्र रात्री १२ नंतर बंदी घातल्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये दिले होते. त्यांनी मात्र अजूनपर्यंत दिले नाहीत. हा नोटबंदीचा फटका मला बसला. तेव्हा देशात नोटबंदी करताना देशातील नागरिकांना विश्वासात घेऊन देशात सरकारने नोटबंदी करावी.  
Comments
Add Comment