Saturday, November 8, 2025

मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

मुंबई (प्रतिनिधी): हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रविभवन येथील मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांची चांगलीच खरडपट्टी केली.

राज्य सरकार आर्थिक संकटातून जात असताना विधानसभा अध्यक्षांच्या बंगल्यावर १ कोटी २५ लाख, विधान परिषदेचे सभापती यांच्या बंगल्यावर १ कोटी १० लाख, कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या बंगल्यावर १ कोटी १० लाखांचा निधी इंटिरिअर, डागडुजी व फर्निचर यासाठी खर्च केला जाणार होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही मंत्र्याच्या बंगल्यावर ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करायचा नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या बंगल्यावर १ कोटी २५ लाखांचा निधी खर्च करावा लागणार होता. आता ते काम ३५ लाखांतच पूर्ण करावे लागणार आहे. कृषिमंत्री भरणे यांच्या बंगल्यावर केल्या जाणाऱ्या कामांमध्ये छताची संपूर्ण दुरुस्ती, टाईल्स बदलणे यासह अन्य कामे केली जाणार आहेत.

Comments
Add Comment