मोहित सोमण:सेबीने एक मोठी घोषणा केली आहे. सेबीने केवळ आणि केवळ सेबी अधिकृत सोने गुंतवणूकीत पैसे गुंतवण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. सेबीने गोल्ड संबंधित ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) अथवा गोल्ड डेरिएटिव कॉन्ट्रॅक्टमध्येच व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे. सेबीच्या निर्देशनास आले होते की अनेक विविध सोशल मिडिया व्यासपीठातून मान्यताप्राप्त नसलेल्या गोल्ड फंडात गुंतवणूकदार पैसे गुंतवत आहे. अनेकदा या जाहिराती फसव्या असतात. त्यामुळे सेबीने अधिकृत केलेल्या व भांडवली बाजारात व्यापार करणाऱ्या व्यासपीठावरुनच गुंतवणूकदारांनी ईटीएफ अथवा डिजिटल गोल्ड फंडात आपली गुंतवणूक करावी असा सल्ला सेबीने दिला आहे.
यापूर्वीही सेबीने वेळोवेळी डिजिटल गोल्डविषयक नियमावलींची चौकट (Regulatory Framework) आखून दिले आहे. तरीही काही कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करत त्यांना गुंतवणूकीसाठी प्रवृत्त करतात या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सेबीने हे धोरणात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. अशा फंडात गुंतवणूक केल्यास मोठी जोखीम गुंतवणूकदारांना सोसावी लागते. ज्यात कधीकधी मोठे नुकसानही होऊ शकते अथवा गैरव्यवहार, गैरव्यवहाराचे धोकेही अंतर्भूत असतात. त्यामुळे अशा उत्पादनांपासून (कमोडिटी अथवा फंड) लांब राहण्याचा सल्ला सेबीने दिला आहे.
यावेळी सेबीने आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की,'या संदर्भात असे कळविण्यात येते की अशी डिजिटल सोने उत्पादने सेबी-नियमित सोने उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत कारण ती सिक्युरिटीज म्हणून अधिसूचित केलेली नाहीत किंवा कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणून नियंत्रित केलेली नाहीत. ती पूर्णपणे सेबीच्या कक्षेबाहेर काम करतात. अशा डिजिटल सोने उत्पादनांमुळे गुंतवणूकदारांना महत्त्वपूर्ण जोखीम येऊ शकतात आणि गुंतवणूकदारांना प्रतिपक्ष आणि ऑपरेशनल जोखमींना सामोरे जावे लागू शकते. गुंतवणूकदारांना/ सहभागींना याची जाणीव करून दिली जाते की सिक्युरिटीज मार्केटच्या कक्षेतील कोणतीही गुंतवणूकदार संरक्षण यंत्रणा अशा डिजिटल सोने/ई-गोल्ड उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असणार नाही.'






