Saturday, November 8, 2025

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन जाणाऱ्या एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बसमधील सर्व २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर किंवा तांत्रिक कारणामुळे नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या सर्व २२ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून, सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, चालक दारूच्या नशेत होता का किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

बस झाडावर आदळली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, निलज फाटा येथे येताच बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. चालकाने प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी बस रस्त्याच्या कडेच्या झाडावर धडकवली. बसमध्ये एकूण २२ विद्यार्थी, १ केअर टेकर आणि चालक होता. अपघातानंतर जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत दिलासादायक बाब समोर आली आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असून, त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक अधिक संतप्त झाले आहेत. शालेय वाहतुकीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पालकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, चालकाच्या निष्काळजीपणामुळे की बसमध्ये तांत्रिक बिघाड होता, या प्रकरणाची गहन चौकशी पोलीस करत आहेत. हा अपघात मोठा होता होता टळला असला तरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment