Saturday, November 8, 2025

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त
मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस फुटांच्या नव्या घरात राहण्यास गेले. मात्र, त्यांना घरांतून पाणी टपकणे, साफसफाई नसणे, निकृष्ट वायरिंग, डास आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव, अशा असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातही १५ दिवसांपासून २५६ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. थर्ड पार्टी करारानुसार नेमलेल्या कंत्राटदाराने पाठविलेल्या पाण्याच्या टँकरवर ते अवंलबून आहेत. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाने चाळ क्रमांक ८, ९, १०, ११, ३०, ३१ आणि ३६ मधील रहिवाशांना इमारत क्रमांक १ ‘डी’ विंगमध्ये सदनिका दिल्या आहेत. मात्र, येथेही समस्या भेडसावत असल्याने ते म्हाडाला पत्र देणार आहेत. ड्रेनेज लाइन चोकअप होत असून, तक्रार करूनही सफाई होत नाही. डीसीसी कन्स्ट्रक्शनने मोकळ्या परिसरात एकदाच धूर फवारणी केली. कारपेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशन पुरवण्यासाठी नाइट फ्रंटसोबत करार केला आहे; परंतु मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने तक्रारी सोडविल्या जात नाहीत. स्वच्छता कंत्राटदाराकडे मनुष्यबळ नाही. त्यामुळे रहिवाशांनाच कचरा कुंडीमध्ये टाकावा लागत आहे. लिफ्ट, जिने, लॉबीमध्ये सफाई होत नाही. चाळ क्रमांक २५ आणि २६ मधील मोकळी जागा पार्किंगसाठी आहे. मात्र, येथे सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे रहिवासी सोडून अज्ञात व्यक्तींकडून पार्किंग केली जाते. परिणामी, पार्किंगसाठी जागा मिळत नाही. पार्किंगमध्ये चार्जिंग पॉइंट नाहीत.

निकृष्ट वायरिंगचा फटका

निकृष्ट वायरिंगमुळे डोअर बेल, गिझर जळाले.

लिफ्टमधील व्हेंटिलेशन फॅन काम करत नाही.

मुख्य प्रवेशद्वार वगळता उर्वरित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

घराचे वॉटर प्रूफिंग केलेले नसल्यामुळे छतातून पाण्याची गळती होत आहे.

सुरक्षारक्षकाअभावी दुसरेच करतात पार्किंग.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा