मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे त्यांचाकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. यानंतर भारतीय संघाचा मान असलेली ट्रॉफी मोहसीन नक्वी परत घेऊन गेले. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबरला आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला. यावेळी आयसीसी बोर्डाच्या सर्व सदस्यांनी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण पद्धतीने या वादावर मार्ग काढला पाहिजे, असे मत मांडले. दरम्यान, आशिया कप ट्रॉफी वादासंदर्भात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ज्यानुसार या समस्येवर मार्ग काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. आयसीसीच्या या बैठकीला मोहसीन नक्वी देखील उपस्थित होते.
दुबईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले असून भारताने तीन वेळा पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदा भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले. या दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तान पराभूत झाला. आशिया कपचा अंतिम सामना सुद्धा भारत विरूद्ध पाकिस्तानमध्ये झाला. यावेळी भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशियाई कप नावावर केला. सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईच्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात आहे.






