मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला केवळ ११९ धावांवर रोखले आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
या विजयात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाज म्हणून त्याने १८ चेंडूत २२ धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेले, तर गोलंदाज म्हणून फक्त दोन षटकांत २० धावा देत मिचेल मार्श आणि टीम डेव्हिड या दोन प्रमुख खेळाडूंना माघारी पाठवले. त्याच्या या डावाने सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.
सामन्यानंतर दुबेने आपल्या यशामागील गोष्ट उघड केली. त्याने सांगितले की प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सतत आत्मविश्वास वाढवला आणि आक्रमक गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या सूचनांमुळे त्याच्या बॉलिंगमध्ये सुधारणा झाली. तसेच मोठ्या सीमारेषेचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठे शॉट खेळण्यास प्रवृत्त करण्याची रणनिती त्याने वापरली.
दरम्यान, त्याने मारलेल्या एका षटकाराची विशेष चर्चा रंगली. एडम झाम्पाच्या चेंडूवर त्याने स्टंपबाहेरचा बॉल अचूक टायमिंगने १०६ मीटर लांब पाठवला की बॉल थेट मैदानाच्या बाहेरच गेला.






