Friday, November 7, 2025

प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं ‘सावरताना...’ गाणं प्रदर्शित

प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं ‘सावरताना...’ गाणं प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘असंभव’ या चित्रपटाच्या रहस्यमय आणि उत्कंठावर्धक टिझरने, पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. गूढतेचा, थराराचा आणि सिनेमॅटिक वैभवाचा मिलाफ असलेल्या या टिझर, पोस्टरनंतर आता प्रदर्शित झालेलं ‘सावरताना...’ हे गाणं प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहे.

नैनिताल आणि मसुरीच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये, शुभ्र धुक्याच्या सान्निध्यात आणि हिरवाईच्या कुशीत चित्रित झालेलं हे हळवं रोमँटिक गाणं, नजरेत भरून राहील, असं आहे. 'असंभव'च्या निमित्ताने सचित पाटील आणि मुक्ता बर्वे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, त्यांच्या सुंदर केमिस्ट्रीमुळे या गाण्यात एक वेगळीच रंगत आली आहे. दृश्यरचनेची भव्यता, संगीताची माधुर्यता आणि भावनिक कोमलता यामुळे ‘सावरताना...’ हे गाणं मनाला भिडणारं ठरतं आहे.

क्षितिज पटवर्धन यांच्या अर्थपूर्ण ओळींना अमितराज यांनी सुमधुर सुरावट दिली असून, गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि शिल्पा पै यांच्या आवाजाने जादूई रूप दिलं आहे. मनाला भिडणारी चाल आणि सुंदर सादरीकरणामुळे हे गाणं श्रवणीय आणि दृश्यरूपाने देखील अत्यंत मोहक ठरतं आहे.

या गाण्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक सचित पाटील म्हणाले, “या गाण्याचं चित्रीकरण इतक्या सुंदर ठिकाणी करण्यात आलं आहे की, हे गाणं ऐकतानाही आणि बघतानाही प्रेक्षकांना एक व्हिज्युअल ट्रीट मिळेल. संगीत, निसर्ग आणि भावना या तिन्हींचं अप्रतिम मिश्रण या गाण्यात दिसतं. ‘असंभव’चा थरार या गाण्याच्या माध्यमातून थोडा मृदू, रोमँटिक रंग घेऊन समोर येतो.”

‘असंभव’ या रहस्यमय थरारपटाचं दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून, सहदिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'थरार, भावना आणि सुरावटींचा संगम असलेला हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment