देशाचा विकास झपाट्याने करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी मराठवाड्याने यापूर्वी ताकद लावली. तेच चित्र पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार आहे. भाजपने 'छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर तसेच नांदेड या आठ जिल्ह्यांत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर कामे केली आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी राहणार, असे चित्र आज दिसून येत आहे.
‘विकास हेच ध्येय’ या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात विविध विकासकामांना भरभरून निधी दिला. त्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच दिसून येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात सर्व पक्षांच्या नेत्यांकडून चाचपणी केली जात आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच काँग्रेस पक्षाच्यावतीने मराठवाड्यात विविध नेत्यांनी वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याच्या नावावरून उपस्थिती लावली. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद व महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना यश मिळावे, यासाठी सर्वपक्षीय नेते जास्तीत जास्त निधी देऊन विकासकामांचा धुराळा उडवीत आहेत. देशाचा विकास झपाट्याने करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी मराठवाड्याने यापूर्वी ताकद लावली. तेच चित्र पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार आहे. मराठवाड्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला विसरणार नाही, असे चित्र दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर तसेच नांदेड या आठ जिल्ह्यांत भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर कामे केली. त्यामुळे मराठवाड्यातील जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी राहणार, असे चित्र आजघडीला दिसून येत आहे. सर्वच पक्षांच्या सभा मराठवाड्यात अलीकडच्या काळात पार पडल्या. त्यावेळी भाजप वगळता अन्य कुठल्याही पक्षाच्या सभांना जास्त गर्दी नव्हती. मराठवाडा हा एकेकाळी शिवसेनेचा गड होता. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात होता. त्या पाठोपाठ काँग्रेसने देखील मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत एकेकाळी चांगलेच वर्चस्व गाजविले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर आजपर्यंत भाजपने केलेली विकासाची घोडदौड संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर भाजपकडे मतदार झपाट्याने वळू लागला. त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील अनेकांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहून ‘शतप्रतिशत भाजप’ हाच नारा विकासाच्या दृष्टिकोनातून स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मराठवाड्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. त्या निधीमुळे मराठवाड्याचा कायापालट झाला व अनेक विकासाची कामे अद्यापही सुरू आहेत. मराठवाड्यात पाण्याची समस्या लक्षात घेऊन वॉटर ग्रीड प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
यापूर्वी तत्कालिन उबाठा गटाचे मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मराठवाड्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविण्याचे पाप उबाठाने केल्यामुळे त्यांच्याविषयी मराठवाड्यात चीड निर्माण झाली. भाजपने मात्र कुठलाही दुजाभाव न करता संपूर्ण मराठवाड्यात विकासाला हातभार लावला. त्यामुळेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठवाड्यातील मतदार नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला भरीव प्रमाणात मतदान करण्याच्या मनस्थितीत आहेत. मराठवाड्याच्या सीमेवर तेलंगणा हे राज्य आहे. या ठिकाणी एमआयएमचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी हे पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत नांदेडमध्ये एमआयएमच्या उमेदवारांना पुढे करण्याच्या दृष्टिकोनातून दौरे करत आहेत. यापूर्वी एमआयएम पक्षाच्या १३ नगरसेवकांना निवडून आणण्यात नांदेड महापालिकेत ओवेसी यांना यश आले होते. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील नांदेड जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नांदेडसह लातूर, जालना जिल्ह्यात महापालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील मराठवाड्यात दौरे वाढविले आहेत. मराठवाड्यातील जास्तीत जास्त जिल्हा परिषदा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी आखणी सुरू केली आहे. उबाठाचे नेते देखील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवत मराठवाड्यात फिरत आहेत. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे झालेले अतिवृष्टीतील नुकसान लक्षात घेऊन भाजपने भरीव मदत केलेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी खाल्लेल्या मिठाला जागणारे आहेत. भाजप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाचे नेते शेतकऱ्यांची मते वळवू शकणार नाहीत, असे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यादरम्यान भाजप वगळता अन्य कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी नागरिकांना जवळ केलेले नाही. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपने नेहमीच पुढाकार घेतला. त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपलाच होणार आहे. येणाऱ्या २० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट होईल. एकंदरीत मराठवाड्यात भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ येतील, असा तर्क राजकीय विश्लेषक लावत आहेत.
- डॉ. अभयकुमार दांडगे