Friday, November 7, 2025

कल्याणमधील रिंगरोड प्रकल्प लवकर होणार पूर्ण! आयुक्तांचे आश्वासन

कल्याणमधील रिंगरोड प्रकल्प लवकर होणार पूर्ण! आयुक्तांचे आश्वासन

कल्याण: शहरातील वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून कल्याणमध्ये रिंगरोड तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावित रिंगरोडचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी या मार्गातील अडथळ्याची महापालिका आयुक्तांसह 'एमएमआरडीए' च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी पुढील दोन महिन्यांत सगळे अडथळे दूर झाल्यास सात महिन्यांत दुर्गाडी ते मोठागाव माणकोली या सर्वात मोठ्या टप्प्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन 'एमएमआरडीए' कडून देण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून कल्याण, डोंबिवली शहरांतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित रिंगरोडचे काम सुरू आहे. या कामाचा वेग वाढवून नागरिकांना लवकरात लवकर हा रोड वापरण्यास द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यामुळे आता हे काम लवकर मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी रिंगरोडची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान रिंगरोड प्रकल्पात रेल्वे प्रशासनासह स्थानिक नागरिकांच्या जागा बाधित होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. यावर बाधित चाळधारकांचे तातडीने पुर्नवसन करत भूखंडधारकांना टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करून पुढील दोन महिन्यात सर्व जागा हस्तांतरित कराव्यात, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Comments
Add Comment