मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव पाण्याचे नियोजन करणे शक्य नसले तरी या भागांतील दुषित पाणी पुरवठा आणि जलवाहिनीची गळती या दोन समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पाण्याच्या गळती दुरुस्तीसाठी आवश्यक असल्यास गळतीचा शोध घेत रस्ता तथा पदपथ खोदण्याची परवानगी तातडीने दिली जावी, जेणेकरून गळती दुरुस्तीची कामे त्वरीत होवून नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
दहिसर ते मालाड या भागातील पाणी समस्येबाबत उत्तर मुंबई लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आपल्या स्तरावर लोकप्रतिनिधींची एक बैठक घेवून ही समस्या निकालात काढण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी उत्तर मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपाचे आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, संजय उपाध्याय यांच्यासह उत्तर मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, गणेश खणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उत्तर मुंबईसह पश्चिम उपनगरातील पाणी समस्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. पश्चिम उपनगराची लोकसंख्या वाढत असतानाही या भागाला पाण्याचा पुरवठा फारच कमी आहे, त्यातुलनेत शहरात लोकसंख्या कमी होत असतानाही तेथील पाणी पुरवठा कमी झालेला नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्यात असमानता असून लोकसंख्येनुसार समानता आणली जावी अशी मागणी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी केली. परंतु, मुंबईची पाण्याची मागणी आणि पुरवठा यामध्येच तफावत असल्याने असे करता येणार नाही हे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे अखेर तात्पुरती व्यवस्था म्हणून दुषित पाण्याची समस्या आणि गळती दुरुस्ती यावर तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन दिले. त्यामुळे जलावहिन्यांमधील गळतीची तातडीने दुरस्ती केली जावी, यासाठी खोदकाम करावे लागत असल्यास त्याला तातडीने परवानगी दिली जावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. तसेच दुषित पाण्याची समस्याही तातडीने हाती घेवून ती निकालात काढण्यावर भर दिला जावा, जेणेकरून या परिसरातील नागरिकांना होत असलेल्या पाणी समस्या निकालात काढली जाईल,असे आयुक्तांनी जलअभियंता विभागाला निर्देश दिले आहेत.