Friday, November 7, 2025

पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले असताना, अजित पवार यांनी या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाला एक नवे 'ट्विस्ट' मिळाले आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यात १८०० कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, नियमानुसार ६ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणे अपेक्षित असताना, फक्त ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचेही उघड झाले होते.

या आरोपांनंतर सुरुवातीलाच आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यांनी आता जो खुलासा केला आहे, त्याने विरोधकांनाही विचार करायला लावला आहे.

अजित पवार यांनी स्पष्ट केले, "माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही आणि मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण आता मी सांगतोय, या व्यवहारामध्ये आतापर्यंत एकही रुपया कोणालाही देण्यात आलेला नाही."

त्यांनी पुढे मोठी घोषणा करत सांगितले की, या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सर्व दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) देखील रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून, महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.

यावेळी अजित पवार यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. "माझ्या नावाचा वापर केला तर ते मला चालणार नाही," असे ते म्हणाले. "कोणही असो, अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये," अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

पुण्याच्या १८०० कोटींच्या जमिनीचा ३०० कोटींमध्ये झालेला हा कथित व्यवहार आता अजितदादांनी पूर्णपणे रद्द केल्यामुळे, विरोधकांनी लावलेले आरोप आणि शासकीय नियमांचे उल्लंघन या दोन्ही गोष्टींवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >