करिअर : सुरेश वांदिले
व्यवस्थापन शाखेतील ज्ञान प्रज्ञान करणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था आता पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.च्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळया अभ्यासक्रमांची संधी देऊ लागल्या आहेत. या संस्थांनी आता पदवीस्तरीय अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम प्रज्ञावंत मुला/मुलींसाठी उत्कृष्ट करिअर घडवण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून देतात. असे काही पदवीस्तरीय अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट बंगळूरुने २०२६ च्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमांची प्रारंभीची प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रम
(१) बी.एस्सी (ऑनर्स) इन डाटा सायन्स वुइथ मायनर्स इन इकॉनॉमिक्स ॲण्ड बिझिनेस स्टडीज आणि (२) बीएस्सी (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स वुइथ मायनर्स इन डाटा सायन्स ॲण्ड बिझिनेस स्टडीज. हे दोन्ही अभ्यासक्रम नव्या युगातील उदयमान क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यासाठी या संस्थेमार्फत सर्वतोपरी मार्गदर्शन केले जाईल. या विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय सल्लागार कंपन्या, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या, डाटा ॲनिलिटिक्स, धोरण संशोधन संस्था, तंत्रज्ञान आणि स्टार्टअपमध्ये विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधन कार्याकडे वळायचे आहे, त्यांच्यासाठी चांगल्या शैक्षणिक संस्थांचे प्रवेशद्वार सुलभतेने उघडले जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या तयारीसाठी कार्याशाळांचे आयोजन केले जाईल. प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाईल. या संस्थेसोबत असलेली उद्योजकीय संपर्क साखळी आणि संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सक्षम अशा नेटवर्किंगचा लाभ मिळवून दिला जाईल. विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्राध्यापकांसमवेत संशोधन प्रकल्प करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी, केस स्टडी (विषय/प्रकरण) विकासात सहभागी होऊ शकतील किंवा शेवटच्या वर्षी स्वतंत्ररित्या असे प्रकल्प करू शकतील. हा अभ्यासक्रम आयआयएमचे उच्च प्रशिक्षित प्राध्यापक, इतर संस्थांमधील नामवंत शिक्षण तज्ज्ञ आणि अनुभवी उद्योजक शिकवतील.
हा बीबीए अभ्यासक्रम नाही. हे अभ्यासक्रम बहुज्ञानशाखाविषयक दृष्टिकोन स्वीकारतात. अधिक सखोल सांख्यिकीय व विश्लेषणात्मक पाया प्रदान करतात. अर्थशास्त्र आणि डेटा सायन्सचे एकत्रीकरण विद्यार्थ्यांना जीवन-कौशल्यांसोबतच सक्षम विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास करण्यास मदत करते. त्यामुळे ते डेटा-आधारित संस्थांमध्ये नेतृत्वाच्या भूमिकेसाठी सुसज्ज ठरतात. या अभ्यासक्रमांची संरचना पदवीपूर्व व्यवसाय शिक्षणासाठी भविष्यवेधी दृष्टिकोन लक्षात ठेऊन करण्यात आली आहे. अर्थशास्त्र आणि डेटा सायन्समधील विश्लेषणात्मक काटेकोरपणा आणि व्यवसाय अभ्यासातील उपयोजित (ॲप्लाइड) शिक्षण यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक डेटा-केंद्रित वातावरणातील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी तयार करते.
या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात मुख्य विषय घटक, मेजर स्पेशलायझेशन, दुय्यम विषय घटक यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र, डेटा सायन्स आणि बिझिनेस स्टडीज या विषय घटकांचे ज्ञान प्रदान केले जाईल. तीन वर्षांनंतर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रम सोडावयाचा असल्यास, त्याला तशी मुभा दिली जाईल.
अर्हता
हे दोन्ही अभ्यासक्रम प्रत्येकी चार वर्षांचे आहेत. दोन्ही अभ्यासक्रमाला कला, वाणिज्य आणि विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. दहावीमध्ये या विद्यार्थ्यांना गणितात किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. विद्यार्थ्याचे वय १ ऑगस्ट २०२६ रोजी किमान २० वर्षे असणे आवश्यक.
प्रवेश प्रकिया
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत आयआयएमबी-युजी ॲडमिशन टेस्ट ही चाळणी परीक्षा घेतली जाईल. या चाळणी परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा असेल. ही संगणाकाधारित परीक्षा राहील. यामध्ये पुढील घटकांवर ६० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. (१) इंग्रजी आकलन (इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन)-१५ प्रश्न, (२) सांख्यिकी आणि माहिती विश्लेषण (क्वांटिटेटिव्ह आणि डेटा इंटरप्रिटेशन)-३० प्रश्न, (३) तार्किक कारणमीमांसा (लॉजिकल रिझनिंग)-१५ प्रश्न. निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण कपात केली जाईल.






