Wednesday, January 14, 2026

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली गोलंदाजीची ताकद दाखवून दिली. या सामन्यात त्याने चार षटकांत २७ धावा देत एक विकेट घेतली आणि टीम इंडियाला ४८ धावांनी विजय मिळवून देण्यात हातभार लावला. या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आणि मालिका गमावण्याचा धोका टाळला.

या सामन्यातील कामगिरीमुळे बुमराहने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनत त्याने पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलला मागे टाकले. अजमलने ११ डावांमध्ये १९ बळी घेतले होते, तर बुमराहने १६ डावांत २० बळी मिळवले आहेत.

या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद अमीर १७ बळीसह तिसऱ्या क्रमांकावर असून, न्यूझीलंडचा मिशेल सँटनरही १७ बळींसह चौथ्या स्थानावर आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमधील गाब्बा स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे जसप्रीत बुमराहला आणखी एक मोठी कामगिरी करण्याची संधी मिळेल. बुमराह एक बळी घेऊन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळी पूर्ण करेल, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडूही बनेल.

Comments
Add Comment