मंत्री नितेश राणे यांचा नाशिकमध्ये विरोधकांना सवाल
नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? लोकसभा निवडणुकीत १४ वेळा बुरखा घालून मतदान झाले, तेव्हा का विचारले नाही? बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला होत्या का, हा प्रश्न कुणी विचारला का? मोहम्मद अली रोडवर किती बोगस मतदार आहेत, त्याबद्दल का बोलले जात नाही? दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यावेळी या विषयावर का काही विचारले नाही, असा सवाल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केला.मंत्री राणे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, मत्स्य उत्पादन व व्यवसाय कसा सुरू आहे. कृषी दर्जा मिळाल्यानंतर विभागाचे कामकाज कसे सुरू आहे, याचा मी जिल्हानिहाय आढावा घेत आहे. त्या अानुषंगाने ही बैठक घेण्यात आली. पार्थ पवार कंपनीच्या जमीन प्रकरणाबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले की, या प्रकरणाची अद्याप मला माहिती मिळालेली नाही. या संदर्भात भाजप नेते निर्णय घेतील.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवरील टीकेबाबत बोलताना राणे म्हणाले की, आमच्या कीर्तनकारांवर वारंवार टीका केली जाऊ नये. मुस्लीम देशभक्तांबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही; पण जिहादी विचारांचे ‘हिरवे साप’ आहेत, त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे. मौलाना डुप्लिकेट विषय असतो, कारण ते पूर्वी हिंदूच होते, असा उल्लेख त्यांनी केला.
भांडुपचा देव आनंद लवकर टीव्हीसमोर यावा
संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना मंत्री राणे म्हणाले की, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही आमची इच्छा आहे. आमची जुगलबंदी सुरू असते, त्यामुळे भांडुपचा देवानंद पुन्हा लवकर टीव्हीसमोर यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकाने पाहिजेत
नाशिक, त्र्यंबकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकाने लागली पाहिजेत, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले. आम्ही मस्जिदबाहेर दुकान लावतो का? जर आमचे नियम मान्य नसतील, तर मग इथे राहू नका. कुंभमेळ्यात हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत, ही मागणी नाही, तर हे झालेच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.






