धूम मचाले धूम...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपटसुंभ धोरणांना खुद्द अमेरिकेतच किती कडवा विरोध आहे, याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या काही निवडणुकींच्या निकालावरून सगळ्या जगाला आला असेल. या निवडणुकांत न्यूयॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक सगळ्यात महत्त्वाची होती. न्यूयॉर्कचं जागतिक स्थान नव्याने सांगायला नको. सगळ्या जगातून लोक या शहरात आले आहेत. शिवाय, जगातील सर्वाधिक श्रीमंतही याच शहरात राहतात. न्यूयॉर्क नेहमीच जागतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी असतं. ट्रम्प यांनी त्यामुळे तिथली निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली होती. न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडीचा संबंध त्यांनी थेट अमेरिकेच्या जागतिक प्रतिष्ठेशी जोडला होता. आधी 'अमेरिकन' म्हणून आणि त्यानंतर वेगवेगळे धार्मिक गट म्हणून त्यांनी न्यूयॉर्कच्या मतदारांच्या अस्मिता परस्परांविरोधात पेटवण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण, न्यूयॉर्कच्या मतदारांनी ट्रम्प यांच्या असल्या कोणत्याच प्रयत्नांना भीक घातली नाही. मूळच्या भारतीय असलेल्या, 'मान्सून वेडिंग'सारखा चित्रपट करणाऱ्या विख्यात दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मुलाला, जोहरान ममदानी यांना न्यूयॉर्कच्या मतदारांनी बहुमताने निवडून दिलं. एकूण २०.५५ लाख मतदारांपैकी १०.३६ लाख मतदारांनी ममदानी यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं. ममदानी ज्या पक्षाचे उमेदवार होते, त्याच पक्षाचे बंडखोर उमेदवार अँड्रयू क्युमो यांना ८.५४ लाख मतं मिळाली. उर्वरित मतं ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मिळाली. ती किती कमी असतील, याचा अंदाज आपल्याला या आकडेवारीवरून येईल. सर्वाधिक श्रीमंत जिथे राहतात, त्या न्यूयॉर्कच्या मतदारांसमोर ममदानी भोजन, महागाई आणि निवाऱ्याचा, गरिबांचा जाहीरनामा घेऊन गेले आणि तरीही त्यांना नागरिकांनी भरभरून मतदान केलं. यावरून ट्रम्प यांचा निषेध नोंदवण्याची तिथल्या जनतेची आस किती तीव्र आहे, हे लक्षात येतं.


या निवडणुकांमध्ये विजयी झालेले ममदानी हे एकटेच मूळ भारतीय नाहीत. वर्जिनिया आणि न्यू जर्सीच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीतही ट्रम्प यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला. वर्जिनीयामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या गजाला हाश्मी आणि ओहायोतल्या सिनसिनाटी शहराच्या महापौरपदी आफ्ताब पुरेवाल निवडून आले. पुरेवाल यांनी तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्सच्या सावत्र भावाचा, कोरी बोमन यांचा पराभव केला. ममदानी यांनी निवडून येता येता बरेच विक्रमही केले. न्यूयॉर्कच्या महापौर पदावर विराजमान होणारे ते पहिले मूळ भारतीय आहेत. पहिले मुस्लीम आहेत आणि गेल्या १०० वर्षांतील सर्वात तरुण महापौर आहेत! वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ते न्यूयॉर्क शहराचे १११ वे महापौर झाले आहेत. न्यू जर्सीमध्ये पहिल्यांदा कोणी महिला उमेदवार पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेऊन विजयी झाली आहे. अमेरिकेतली ती सर्वात खर्चिक निवडणूक ठरली आहे. तिथे प्रचारावर तब्बल १ हजार ६६० कोटी रुपये खर्च झाले. २००५ मध्ये न्यू जर्सीमध्ये १ हजार १९७ कोटी रुपये खर्च झाले होते! अमेरिकेच्या पन्नास राज्यांपैकी २४ राज्यांत आता डेमोक्रॅटिक गव्हर्नर असून २६ राज्यांत रिपब्लिकन गव्हर्नर आहेत. देशातल्या आपल्या पक्षाच्या या काठावरच्या बहुमताकडे ट्रम्प यांनी वेळीच काळजीपूर्वक पाहिलं नाही, तर आणखी बरोब्बर एक वर्षाने, पुढच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागलेला असेल. आपल्याबरोबरच आपल्या पक्षाला घेऊन ट्रम्प बुडतील. एखाद्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात जनमत जाणं अमेरिकेसाठी नवं नाही. ते ज्या वेगाने आणि ज्या तीव्रतेने विरोधात जात आहे, ते जास्त चिंताजनक आहे. ट्रम्प यांच्या घोषणांतील पोकळपणा तिथल्या जनतेने ओळखल्याचं हे द्योतक आहे. अमेरिकनांनीच ट्रम्प यांच्यावर असा अविश्वास दाखवला, तर त्यांच्या जगभर चाललेल्या अनावश्यक उठाठेवींना आपोआपच आळा बसण्याची शक्यता आहे. त्यातला जोर जाईल. ट्रम्प यांचा आत्मविश्वास डळमळीत होईल. ट्रम्प यांची दादागिरी जगात कोणीच चालू देणार नाही. पाकिस्तानचा अपवाद सोडून!


अमेरिकेतले डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे दोन्ही पक्ष कमीअधिक भांडवलदारीच आहेत. ममदानी यांचं वैशिष्ट्य असं, की त्यांनी उघडपणे लोकशाही समाजवादी असल्याचं सांगितलं आणि त्याच भूमिकेवर निवडणूक लढवली. ट्रम्प यांनी त्यांच्यावर कम्युनिस्ट शिक्का मारण्याचा प्रयत्न केला. पण, मतदारांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. ममदानी साम्यवाद्यांची शासन नियंत्रित अर्थव्यवस्था मांडत नसून त्यांच्या अजेंड्यामध्ये न्यायाच्या कल्पना आहेत, हे तिथल्या मतदारांनी मान्य केलं. ममदानी हे मुस्लीम असल्याने, पॅलेस्टाईनचे कट्टर समर्थक असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर असलेला ज्यू समाज त्यांना मतदान करणार नाही, हा ट्रंप यांचा विश्वासही ज्यू मतदारांनी सपशेल खोटा ठरवला. सर्व लहान मुलांसाठी मोफत बालसंगोपन केंद्रं, अनुदानित घरांच्या भाडेवाडीला प्रतिबंध, सरकारी बसमध्ये सर्वांना मोफत प्रवास आणि जीवनावश्यक वस्तूंची सरकारी दुकानं - या ममदानी यांच्या जाहीरनाम्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आपल्याला, आपल्या आवाहनांना आणि अजेंड्याला लोकांनी नाकारलं, हे ट्रम्प यांच्या पचनी पडणं शक्यच नाही. त्यामुळे, त्यांनी 'मतपत्रिकेवर माझं छायाचित्र नव्हतं' असं लंगडं कारण पुढे करून त्यामुळे, रिपब्लिकन उमेदवारांचा पराभव झाला, असं सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते देत असलेलं शटडाऊनचं दुसरं कारण मात्र खरं आहे. ३६ दिवस चाललेल्या शटडाऊनने ट्रम्पना धडा शिकवला. या शटडाऊनमुळे नऊ लाख कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं आहे. आणखी २० लाख कर्मचारी काम करताहेत. पण, त्यांच्या वेतनाबद्दल पूर्ण अनिश्चितता आहे. लोकशाही समाजवादी विचारांच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग ट्रम्प यांनीच प्रशस्त करून दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाला ट्रम्प जबाबदार आहेतच. पण, हे उमेदवार हरले, म्हणून डेमोक्रॅटिक उमेदवार जिंकले, असं नाही. डेमोक्रॅटिक उमेदवारांच्या विजयाला ट्रम्प यांनी स्वतःच्या उपटसुंभ, बालिश धोरणांनी आणि वक्तव्यांनी वाट करून दिली. त्यामुळे, त्यांचे उमेदवार पराभूत झाले, हे अधिक खरं आहे. ममदानी यांनी आपल्या विजयानंतर आनंद साजरा करताना 'धूम मचाले धूम...' या हिंदी गाण्यावर नृत्य केलं. त्यांनी केलेली गाण्याची निवड या अर्थाने खरोखरच सार्थ आहे.

Comments
Add Comment

अखेर बिगुल वाजले

महाराष्ट्र राज्यात ज्याची राजकीय घटकांना कमालीची प्रतीक्षा होती, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

भाविकांची चेंगराचेंगरी

तीन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यात व्यंकटेश्वर मंदिरात एकादशीच्या पूजेदरम्यान झालेल्या

जगज्जे‘त्या’

१९८३ साली भारताच्या पुरूष संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. १९८३ साली त्या वेळी बहुतेकांकडे टीव्ही नव्हते. पण तो

संधीसाधूंचा मोर्चा

महाराष्ट्रातील विरोधकांनी काल मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवरून महापालिका कार्यालयापर्यंत सत्याचा मोर्चा काढला.

भलतं दु:साहस

एखाद्या इंग्रजी चित्रपटाचं कथानक वाटावं असं ओलीसनाट्य गुरुवारी मुंबईतल्या पवईच्या आर ए स्टुडिओमध्ये घडलं.

डिजिटल अरेस्टचे बळी

‘डिजिटल अरेस्ट' नांवाने विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सुरू असलेल्या एका मोठ्या रॅकेटमुळे पुण्यात एक