Thursday, November 6, 2025

जे काही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा बोलणार

जे काही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा बोलणार

खासदार श्रीकांत शिंदेंचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर वार

बुलढाणा  : राज्यातील गडकिल्ल्यांवरील नमो केंद्रावरून राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर टीका केली आहे. हे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पर्यटकांना माहिती व सुविधा देण्यात येणार आहे. शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींच्या नावाने केंद्र उभारण्याला राज ठाकरेंनी विरोध केला आहे. हे केंद्र फोडून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्याचवरून आता श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात, कारण त्यांच्याकडून काहीही चांगले झाले नाही. हे लोक काही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार. एवढी आगपाखड करण्याची गरज काय? गडकिल्ल्यावर पर्यटकांना माहिती मिळण्यासाठी ते केंद्र सुरू करण्यात येत आहे. गडकिल्ल्यांचे किंवा मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम महायुतीने केले. त्यामुळे नरेंद्र मोदींचे कौतुक करण्याऐवजी ते फोडण्याची भाषा करतात. मात्र कधीकाळी यांनीही नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते.’

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘लोकांना कोण खरे, कोण खोटे, कोण देणार आहे, कोण घेणार आहे. हे सगळे माहीत असते. आता अतिवृष्टी झाली, त्यावेळेस महायुती सरकारने ३८ हजार कोटींचे पॅकेज दिले. ज्या वेळेस आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना भेटायला गेले तर त्यांनी काही ना काही सोबत नेले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे शेतकरी यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवत आहेत.’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसदर्भात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘आम्ही लोकसभेची व विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे प्रयत्न महायुतीचा असेल, जिथे कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना असतील त्या ठिकाणी वरिष्ठ निर्णय घेतील.’

Comments
Add Comment