Thursday, November 6, 2025

Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर आपटले; ब्राझिलियन मॉडेल काय म्हणाली, पहा..

Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर आपटले; ब्राझिलियन मॉडेल काय म्हणाली, पहा..

मतदार यादीतील फोटोमुळे 'स्वीटी' अर्थात लारिसा थेट चर्चेत

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप करत, हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदानामध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा केला आहे. काल (५ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मतदारांच्या हेराफेरीचा एक धक्कादायक मुद्दा समोर आणला आणि एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावाने २२ वेळा मतदान झाल्याचे सांगितले.

राहुल गांधी म्हणाले, "हरियाणा विधानसभा निवडणुकीत तब्बल २५ लाख बनावट मते टाकली गेली आहेत, तर ५.२१ लाख डुप्लिकेट मतदारांची नोंदणी झाली आहे." अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावांची नोंदणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या मते, हा पूर्णपणे सुनियोजित मतदाराचा गैरव्यवहार आहे, ज्यामुळे काँग्रेसचा विजय पराभवात बदलला. त्यांच्या दाव्यानुसार, हरियाणात प्रत्येक आठव्या मतदारामागे एक मतदार बनावट आहे.

२२ वेळा वापरला 'तो' फोटो!

या आरोपांना ठोस आधार देण्यासाठी राहुल गांधींनी एका परदेशी मॉडेलचे उदाहरण दिले. हजारो किलोमीटर दूर असलेल्या या मॉडेलचे नाव लारिसा (Larissa) आहे. तिचा फोटो हरियाणाच्या मतदार यादीत 'स्वीटी' आणि इतर अनेक नावांनी २२ वेळा वापरला गेला, असा दावा त्यांनी केला.

ब्राझिलियन मॉडेलने आरोप फेटाळला

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या या दाव्यावर मूळ ब्राझिलियन मॉडेल लारिसा हिने स्वतः प्रतिक्रिया दिली असून, तिने मतदान केल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. तिने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला.

पोर्तुगीज भाषेत बोलताना ती म्हणाली, “हॅलो इंडिया! मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडिओ तयार करण्यास सांगण्यात आले. भारतीय राजकारणाशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कधीच भारतात आले नाही. मी ब्राझिलची मॉडेल आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर आहे. माझे नाव अशा प्रकारे राजकारणात ओढले जाणे माझ्यासाठी धक्कादायक आणि हास्यास्पद आहे.”

एका भारतीय पत्रकाराने तिच्याशी संपर्क साधल्यावर तिला हा फोटो दाखवण्यात आला, तेव्हा तिला धक्का बसला. या घटनेवर तिने हसत प्रतिक्रिया दिली, जी तिच्या व्हिडिओत आश्चर्य आणि विनोदी अशा दोन्ही भावना व्यक्त करते.

लारिसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Comments
Add Comment