देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीचे रॅकेट उघडकीस
अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु; पण सर्वांचेच मौन
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आसाममधील नागावमधील कैवर्त या छोट्याशा गावाची लोकसंख्या दोन हजार २०० आहे. इथे भेटणारा प्रत्येकजण तुम्हाला त्यांच्या एकाच किडनीची कहाणी सांगेल. गावातील ४० टक्के लोकांना फक्त एकच किडनी आहे. ड्रग्जच्या व्यसनामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे या लोकांनी त्यांची एक किडनी विकली आहे. त्यांची दुर्दशा पाहून दलाल त्यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांना कोलकाता येथे घेऊन जातात, जिथे शस्त्रक्रियेनंतर त्यांची एक किडनी काढली जाते.
पोलिसांनी याप्रकरणी तीन तस्करांना अटक केली आहे. धरनी दास, महेंद्र दास आणि दीपदास अशी त्यांची नावे आहेत. जे गरिबांकडून किडनी विकण्याचे रॅकेट चालवत होते. गावातील २० टक्के लोक नोकरी करतात, तर १० टक्के लोक शेती करतात. उर्वरित बेरोजगार आहेत. सरकारी योजनांचे फायदे मिळत असूनही, गावकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी ३ ते ६ लाख रुपयांना दलालांना किडनी विकली. गरिबी, अवैध दारूचा व्यापार आणि किडनी विकण्याची सक्ती यामुळे गावाचे रूपांतर अपंगांच्या समाजात होत आहे. रहिवाशांनी सांगितले की अनेक घरांमध्ये पती-पत्नी दोघांनीही प्रत्येकी एक किडनी विकली आहे. जर कुटुंबात पाच सदस्य असतील तर तिघांनी आधीच त्यांची किडनी विकली आहे.
दुसऱ्या पीडिताने सांगितले की, आम्हाला वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली कोलकाताला नेण्यात आले. नंतर, आम्हाला भुलीचे औषध दिल्यानंतर, किडनी काढल्या गेल्या. हे गावात एक उघड गुपित बनले आहे. सर्वांना याबद्दल माहिती आहे, पण कोणीही बोलत नाही. जेव्हा गावातील काही विवाहित महिला त्यांच्या सासरच्या घरातून निघून आईवडिलांच्या घरी गेल्या. तेव्हा या पुरुषांना दलालांनी भावनिकरित्या कैद केले. त्यानंतर, त्यांना कमिशन आणि नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या किडनी विकण्यास प्रवृत्त केले. २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान, मोरीगाव जिल्ह्यातील दक्षिण धरमतुलमध्ये अशाच प्रकारच्या अवयव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्या प्रकरणात वीस गरीब लोक अडकले होते. गुवाहाटी येथील लिलीमाई बडा नावाच्या महिलेला सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली होती. २०२१ मध्ये, नागावमधील हुज गावातील दीपक सिंगला गार्डची नोकरी देण्याचे आमिष दाखवून कोलकाता येथे आणण्यात आले. तेथे वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली त्याची किडनी काढण्याचा कट रचण्यात आला, परंतु दीपकला संशय आला आणि तो पळून गेला.






