आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख
पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी राज्यातील निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांची वसई-विरार आणि पालघरच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरारच्या निवडणूक प्रमुखपदी नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांची तर पालघरच्या निवडणूक प्रमुखपदी बाबजी काठोळे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक दृष्ट्या राज्यात ७५ जिल्हे आहेत. आणि या सर्व ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत. पक्षाचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने भाजपचे सर्व उपक्रम या सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविल्या जातात. दरम्यान, जानेवारी २०२६ पूर्वी राज्यात नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका कालच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यात ७५ निवडणूक प्रमुख नेमले आहेत. तर ३५ निवडणूक प्रभारींची नियुक्ती सुद्धा केली आहे. पालघर आणि वसई विरार जिल्ह्यामधील निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून खासदार डॉ. सवरा यांना जबाबदारी देण्यात आल्याने या बाबीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.






