'गेम' झाल्याचा काँग्रेसचा आरोप, काँग्रेसने घेतली थेट हायकोर्टात धाव!
मुंबई : संपूर्ण देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असताना, केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव मध्ये एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. या प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, मतदानाआधीच तब्बल ७५ टक्के जागा बिनविरोध झाल्या असून, यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत.
बुधवारी या केंद्र शासित प्रदेशात स्थानिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. मात्र, त्यापूर्वीच ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या प्रमुख पदांच्या निवडणुकीत भाजपचे एकूण १२२ पैकी ९१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणुकीपूर्वीच ७५ टक्के जागा भाजपच्या पदरात पडल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे अर्ज बाद, 'षडयंत्रा'चा आरोप
या मोठ्या राजकीय खेळीमागे 'गेम' झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचा दावा आहे की, त्यांच्या ८० टक्के उमेदवारांचे अर्ज निवडणुकीच्या रिंगणातून बाद करण्यात आले. याविरोधात काँग्रेसने थेट मुंबई हायकोर्टात धाव घेऊन बाद करण्यात आलेल्या अर्जांना आव्हान दिले आहे.
काँग्रेसचे प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप केला. त्यांनी तक्रार केली की, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त सात दिवसांचा कालावधी दिला गेला. सुरुवातीचे दोन दिवस अर्ज उपलब्ध नव्हते आणि आवश्यक कागदपत्रांची यादीही वेळेवर मिळाली नाही. अर्ज छाननीचे ठिकाण अचानक बदलले गेले, आणि अर्ज भरण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, भाजपच्या एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झाला नाही, यावर त्यांनी जोर दिला.
दरम्यान, भाजपच्या विजयी उमेदवारांना २४ आणि २५ ऑक्टोबर रोजीच विजयी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
भाजपची ५ वर्षांत मोठी झेप
बिनविरोध झालेल्या जागांची आकडेवारी भाजपच्या विजयाची कहाणी सांगते.
जिल्हा पंचायती: ४८ पैकी ३५ ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले (मागील वेळी भाजपला फक्त ९ ठिकाणी विजय मिळाला होता).
सरपंच पदे: ४४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी तब्बल ३० सरपंच भाजपचे बिनविरोध निवडून आले.
दमन: जिल्हा पंचायतीत १६ पैकी १०, पालिकेत १५ पैकी १२ आणि १६ ग्रामपंचायतींपैकी १० मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.
दीव: आठ जिल्हा पंचायतींपैकी पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
दादरा व नगर हवेली: जिल्हा पंचायतीत २६ पैकी २०, १५ नगरपालिका वॉर्डपैकी १४ आणि २६ ग्रामपंचायतींपैकी १८ ठिकाणी भाजपला यश मिळाले.