नाशिकमध्ये दिवसाढवळ्या खून, हाणामाऱ्या अवैध धंद्यानी चांगलीच डोके वर काढले होते. नऊ महिन्यांत तब्बल ४६ खून झाल्यामुळे नाशिक बिहार होईल का, असा प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात होता. त्याचप्रमाणे सत्ताधारी भाजपच्या शहरातील तिन्ही आमदारांनी नाशिकची गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनासह थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. अनेक पक्ष, संघटनांनी देखील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत आंदोलन केले होते.
त्यानंतर मात्र मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना मोकळीक दिल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले. रस्त्यावरील गुन्हेगारापासून ते सर्वपक्षीय राजकीय क्षेत्रातील बडे गुन्हेगारांवर देखील पोलिसांनी कारवाई केल्याने खऱ्या अर्थाने आता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला झाला असल्याचा पाठिंबा विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला समाजमाध्यम, फलकाच्या माध्यमातून मिळत आहे. अनेक वर्षांनंतर बड्या राजकीय नेत्यांना गजाआड केल्याने त्यांचे गुन्हेगारीतील सहकारी सध्या तरी शांत आहेत. काहींनी नाशिकमधील वास्तव्य दुसरीकडे हलविले आहे. त्यांची देखील पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू आहे.
नाशिकमध्ये नगर परिषदा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काही दिवसांतच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकानंतर लोकप्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्हा परिषद आणि महापालिकेत कामकाज सुरू करतील; परंतु त्यावेळी यातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न नाकारता येत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी जशी आज मोकळी दिली आहे तशाच प्रकारची मोकळीक पुढील काळातही दिल्यास गुन्हेगारी आटोक्यात येऊ शकते अन्यथा बालेकिल्लाला पुन्हा तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये एका वर्षावर कुंभमेळा येऊन ठेपला आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. कुंभमेळ्यात छोट्या, मोठ्या ठेक्यांसाठी मोठी स्पर्धा असेल. या स्पर्धेचे गुन्हेगारीत रूपांतर होऊ शकते. त्याचप्रमाणे रिक्षा, दुकानदार, ठेकेदार, हॉटेलचालक या घटकांकडे देखील पोलिसांना लक्ष द्यावे लागणार आहे. पुढील काळातही राज्य शासन पोलिसांना अशाच प्रकारे मोकळीक देतील, परिणामी निवडणुका आणि सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडेल अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करू या.
८६० बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई
शहरात वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीसाठी अनेक घटकांमध्ये बेशिस्त रिक्षाचालक हा घटकही जबाबदार आहे. रिक्षा थांब्या व्यतिरिक्त रिक्षा थांबविणे, रस्त्यात कुठेही थांबून प्रवासी बसविणे, रिक्षा चालवताना वेड्या-वाकड्या पद्धतीने चालविणे, प्रवाशाशी असभ्य वर्तन करणे, शिवीगाळ देणे असे अनेक वाईट प्रकार सुरू होते. बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी शहरातील कारवाईचा बडगा उभारला. त्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे साडेआठशे रिक्षांवर कारवाई करण्यात आली. याकरिता आयुक्तालयाच्या हद्दीत ८६० रिक्षांची तपासणी करून २४२ गुन्हे, तर ८१७ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान १६ रिक्षा स्क्रॅप करण्यात येऊन ५ लाख ८२ हजार ९५० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलिसांतर्फे चौकाचौकांत जाऊन रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्यात आले. रिक्षाचालकांनी आवश्यक कागदपत्रांसह गणवेश परिधान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सध्या रस्त्यावर असलेल्या रिक्षा चालक गणवेश परिधान केलेले दिसून येत आहे. गेल्या २ दशकात अशा प्रकारची मोठी कारवाई पहिल्यांदाच झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतूक शाखा व पोलीस ठाणे अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या.
एमडी ड्रग्ज प्रकरणी आमदारांवर देखील आरोप
काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील एमडी ड्रग्ज प्रकरण राज्यभरात गाजले होते. शहरातील महिला आमदार आणि समर्थकांवर देखील विरोधी पक्षांकडून चांगलेच आरोप करण्यात आले होते. नाशिक शहरात पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज प्रकरणाने डोके वर काढले आहेत. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) नाशिक शहरात पहिली कारवाई केली. यात मुंबई नाका परिसरात कारमधून मॅफेड्रॉनची (एमडी) तस्करी करणाऱ्या सराईतास अटक केली आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपयांचे २१.५ ग्रॅम एमडी जप्त केले आहे.
अवैध सावकारही रडारवर
हात उसनवार घेतलेल्या २ कोटी ५६ लाख ७० हजार रुपये रक्कमेच्या बदल्यात ७ कोटी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या व इतर साथीदारांच्या नावे दस्त नोंदणी करून ताब्यात घेत बळकावल्या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे पूर्व विधानसभा संघटक विशाल सुभाष कदम, सिद्धेश्वर अंडे, इतर दोन अशा चौघांवर आडगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कदम व पाटील या दोघांना अटक केली आहे. अशाच प्रकारे शहर आणि परिसरात अनेक सावकार नागरिकांना लुटण्याचे काम करत आहेत. अशा सावकारांचा पोलीस शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर आलेल्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पोलिसांनी देखील अन्यायग्रस्त नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
- धनंजय बोडके