उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांचे धारदार टीकास्त्र
नागपूर : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. "मुख्यमंत्री असताना त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कधीच ‘कारपेट’ सोडले नाही. आता सततच्या पराभवानंतर त्यांना लोकांमध्ये जावे लागत असल्याची जाणीव झाली आहे," असा बोचरा टोला फडणवीसांनी नागपूर येथे लगावला.
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत, एकरी ५० हजार रुपये आणि जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी साडेतीन लाख रुपये मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण मुख्यमंत्री असताना ते कारपेटवरून खाली उतरले नाहीत. आता पराभवानंतर किमान त्यांच्या लक्षात आले की लोकांमध्ये जावे लागते."
'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आले...'
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांच्या दौऱ्यामागचे कारणही स्पष्ट केले. ते म्हणाले, "निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते आलेले आहेत. सरकारचं पॅकेज लोकांच्या खात्यात पोहोचतच आहे. त्यामुळे त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाहीये." इतकंच नव्हे तर, "लोकांना पकडून त्यांच्या भेटीसाठी आणले जात आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मदत वाटपाला विलंब का? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याचे आरोप होत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी मान्य केले की, "हे खरं आहे की, काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही. त्या ठिकाणच्या लोकांच्या मनात संभ्रम आहे." परंतु, आरबीआयच्या नियमानुसार रोज जास्तीत जास्त ६०० कोटी रुपयेच वितरित करता येतात. "त्यामुळेच उशीर लागत आहे. मात्र, रोज याच गतीने मदत वाटप सुरू असून, आता जवळपास संपूर्ण पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे मतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी व्यक्त केले.






