Thursday, November 6, 2025

परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया

परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै 

परमेश्वर हा विषय समजला नाही, तर हे जग सुखी होणे शक्य नाही, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. इतिहासकाळापासून ते आजपर्यंत, पुरातन काळापासून ते आजतागायत हे जग सुखी झालेले नाही. जग सुखी व्हावे म्हणून लोकांनी अवतार घेतले. देवांचे अवतार झाले. रामावतार, कृष्णावतार असे अनेक अवतार झाले. हे कशासाठी घेतले? जगाला सुखी करण्यासाठीच हे अवतार घेतले. इतके अवतार होऊन सुद्धा काय झाले? जग जसे होते तसेच आहे. जग जिथे होते तिथेच आहे. किंबहुना पूर्वीच्या काळापेक्षा आज परिस्थिती कठीण आहे. त्यात काही फरक पडलेला नाही. अनेक प्रेषित झाले व या प्रेषितांनी निरनिराळे धर्म स्थापन केले व त्या धर्माच्या अनुयायांनी आपआपसांत तंटेबखेडे केले, दंगेधोपे केले, युद्धलढाया केल्या व या धर्मांच्या नावाखाली जितका रक्तपात झाला तो दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी झाला नसेल. जग सुखी होण्याऐवजी दुःखीच झालेले आहे. किती साधू झाले व आहेत या साधूंचे काय? त्यांनी काय केले त्यांनी जगाचा विचार केला तरी जग आहे तिथेच आहे. मी नेहमी सांगत असतो की पुरातन काळापासून आजपर्यंत परमेश्वराचा जसा विचार व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही म्हणून ही परिस्थिती ओढवलेली आहे. पण आज जेव्हा सत्य सांगायला जातो तेव्हा अनेकांना ते पटत नाही. धर्मामुळे, जातींमुळे, पंथांमुळे, संप्रदायांमुळे मने संकुचित झालेली आहे. बुद्धी संकुचित झालेली आहे. याचा परिणाम म्हणजे भांडणतंटे अधिक झाले. युद्ध लढाया अधिक झाले. जीवनविद्येने याचा पूर्ण विचार केला व यावर तोडगा काढला पाहिजे असे ठरविले. तोडगा काढला नाही, तर हे असेच चालत राहणार. आम्ही जे सांगतो ते लोकांना पटते असे नाही कारण अनेकांचा मेंदू हा चुकीच्या संकल्पनांमध्ये गुंतलेला आहे. द्वैतअद्वैत, विशेष द्वैत विशेष अद्वैत, शुद्ध द्वैत शुद्ध अद्वैत या अनेक गोष्टींमध्ये लोक गुंतलेले होते व अजूनही आहेत. हे मी का सांगतो आहे? कारण या विषयाचा विचार करायचा झाला तर तो नीट समजून घेतला पाहिजे. जीवनविद्या सांगते परमेश्वर ज्याला म्हणतात तो परमेश्वर व आपण समजतो तो परमेश्वर यामध्ये खूप अंतर आहे. लोक आज परमेश्वर म्हटले की मूर्तीकडे जातात. लोकांच्या डोळ्यांसमोर निरनिराळे देव येतात. जे मूर्ती मानत नाहीत त्यांच्या डोळ्यांसमोर काहीच येत नाही. ते काहीतरी कल्पना करतात की कुठेतरी काहीतरी आहे व त्याला ते काहीतरी नाव देतात म्हणजे शेवटी ते कल्पनाच करतात. परमेश्वराबद्दल खरे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिस्थिती चिघळतच जाणार म्हणून जीवनविद्येने यावर तोडगा काढला. जीवनविद्या काय सांगते? परमेश्वर हे आपल्या जीवनाचे मूळ आहे आणि परमेश्वर हाच आपल्या जीवनाचे फळही आहे. याकडे दुर्लक्ष केले तर कुटुंब, जग, विश्व, कधीच सुखी होणार नाही. अगदी कितीही अवतार झाले, किती प्रेषित झाले, कितीही पंथ झाले व कितीही संप्रदाय झाले तरी हे जग असेच चालणार. म्हणून परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया आहे आणि परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा कळसही आहे. या सत्याचा स्वीकार करून परमेश्वराबद्दल सद्गुरुंकडून ज्ञान मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे.प

Comments
Add Comment