Thursday, November 6, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्णायक सामना, टीम इंडिया सामन्यासाठी सज्ज

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्णायक सामना, टीम इंडिया सामन्यासाठी सज्ज

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात करत तिसऱ्या टी २० मध्ये विजयाचं खात उघडलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. रविवारी, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाच्या दिलेल्या आव्हानाचा पाच विकेट्सने पाठलाग करत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत मालिकेत परत प्रवेश केला आहे.

आता मालिकेचा चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताला मालिका जिंकायची असेल, तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे गरजेचे आहे. मात्र, पराभव झाल्यास भारताच्या हातातून मालिकेचा विजय निसटेल. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यासाठी पूर्ण तयारीत असून तीव्र चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथा टी २० सामना गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरुवात होईल, तर नाणेफेक १ वाजून १५ मिनिटांनी होईल.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल. तसेच, जिओहॉटस्टार अ‍ॅपवर लाइव्ह स्ट्रिमिंगची होणार आहे.

कॅरारा ओव्हल मैदानावर तब्बल तीन वर्षांनंतर टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात आहे. या मैदानावर आतापर्यंत फक्त दोन टी २० सामने झाले आहेत – एक ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि दुसरा ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता. आता भारताविरुद्धचा हा तिसरा सामना असल्याने सर्वांचे लक्ष याच दिशेने लागले आहे. टीम इंडिया या मैदानावर पहिला विजय मिळवून मालिकेत आघाडी घेईल का, हे पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुर झाले आहेत.

Comments
Add Comment