Wednesday, November 5, 2025

स्थानिक निवडणुकांत मनसेपासून काँग्रेस एक हात लांबच राहणार

स्थानिक निवडणुकांत मनसेपासून काँग्रेस एक हात लांबच राहणार

महाराष्ट्रात उत्तर भारतीय, अल्पसंख्याक नागरिकांना लक्ष्य

मुंबई : स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा मोठा गाजावाजा होत असला तरी मविआतील काँग्रेसला मनसेशी जवळीक साधण्यास स्वारस्य नसून मनसेला मविआत येणार अथवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना दुसरीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे, सध्या ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज ठाकरे मविआत येतील, अशी चर्चा जोर धरत आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबतची युती काँग्रेसला परडवणारी नाही. त्यामुळेच, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत काँग्रेसने मनसेसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजले असून पुढील काळात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील. त्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती राहील की नाही, महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढवणार की नाही, हेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यातच, मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार नोंदणीवरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हेही आयोगावर टीका करत मविआसोबत असल्याचे दिसून येते. मात्र, मविआमध्ये मनसेला स्थान असेल की नाही, याबाबत काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे.

बिहार निवडणुकांच्या तोंडावर मनसेशी सलगी काँग्रेसला न परवडणारी

इंडिया आघाडीत असलेल्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यास काँग्रेस तयार आहे. मात्र, मनसेसोबत कुठल्याही परिस्थितीती आघाडी होणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मनसेकडून उघडपणे उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक नागरिकांना लक्ष्य केलं जातं, त्यांच्याविरुद्ध भूमिका घेतली जाते. त्यामुळे, मनसेसोबतची आघाडी पक्षाला परवडणारी नाही. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते नुकसानदायक असल्याचेही काँग्रेस नेत्यांचे मत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकतेच निवडणूक आयोग आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक हात लांबच राहणे पसंत केल्याचे दिसून आले. त्यामुळे, ठाकरे बंधू एकत्र आले तरी राज ठाकरे महाविकास आघाडीत असतील की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

Comments
Add Comment