मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेची चार रुग्णालये सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर यापैकी गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय (शताब्दी) रुग्णालय चालवण्याकरता दोन संस्थानी स्वारस्य दाखवले आहे. यासाठी सुरभी आणि तेरणा संस्थेने सहभाग दर्शवला असून या पैकी कोणत्या एका संस्थेची निवड केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आरोग्य सेवांकरता सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरण राबवणार असल्याची घोषणा केली आहे.
नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध देण्याच्या दृष्टिकोनातून आर उत्तर विभागातील ४९० खाटांचे भगवती रुग्णालय, बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नॉस्टिक सेंटर, विक्रोळी पार्क साईट वरील ३० खाटांचे रुग्णालय आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेला हस्तांतरीत झालेले एम पूर्व विभागातील ३०० खाटांचे रुग्णालयांच्या वास्तू ३० वर्षांच्या करारावर आरोग्य सेवांकरता खासगी संस्थांना दिल्या जाणार आहे. यासाठी खासगी संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले जात आहे.
परंतु, याला राजकीय पक्षाकडून विरोध होऊ लागल्याने गोवंडी मदन मोहन मालवीय महापालिका रुग्णालय आणि एम एम आर डी ए कडून प्राप्त झालेल्या ३०० खाटांचे रुग्णालय याकरता विविध संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार हे रुग्णालय चालवण्यासाठी तेरणा एज्युकेशन ट्रस्ट आणि सुरभी एज्युकेशन सोसायटी या दोन संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोघांपैकी एका संस्थेची निवड केली जाणार असून अंतिम मंजुरीसाठी हे प्रस्ताव महापालिका आयुक्त यांना सादर करण्यात आले आहेत.
बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. निवडणूकीच्या पहिल्या ...
पूर्व उपनगरासाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय
शताब्दी रुग्णालयाच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारल्याने पूर्व उपनगरातील नागरिकांना अधिक चांगली आणि अद्ययावत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. पूर्व उपनगरातील हे पहिले आणि शहरातील सातवे वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे. या रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५८० खाटा उपलब्ध असतील. यापैकी ७० खाटा सर्वसामान्य रुग्णांसाठी, तर ३० खाटा पालिकेच्या अन्य रुग्णालयातील संदर्भित रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. या रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जातील, ज्यामुळे मानखुर्द, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहारमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शीव (सायन), राजावाडी, केईएम आणि जे.जे. रुग्णालयांवरील रुग्णांचा भार कमी होण्यास मदत होईल. ३० वर्षांच्या कराराने चालवण्याची योजना असेल.
एम एम आर डी ए च्या रुग्णालयासाठी पुन्हा मागणार अर्ज
मानखुर्द एम पूर्व विभागातील ३०० खाटांचे रुग्णालय वास्तू बांधून तयार असल्याने याठिकाणी खासगी संस्थेची नेमणूक करण्यासाठी स्वारस्य अर्ज मागवले होते. पण याला कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे पुन्हा यासाठी नव्याने स्वारस्य अर्ज मागवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.