बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.
बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन दिले आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी पूर्ण उत्साहाने मतदान करावे. या प्रसंगी, राज्यातील सर्व तरुण मतदारांचे विशेष अभिनंदन जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत..."
बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी एकूण ४५ हजार ३४१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ३६ हजार ७३३ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात १०.७२ लाख नवीन मतदार आहेत. ज्यात १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या ७.३८ लाख एवढी आहे.
बिहार में आज लोकतंत्र के उत्सव का पहला चरण है। विधानसभा चुनावों में इस दौर के सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे पूरे उत्साह के साथ मतदान करें। इस मौके पर पहली बार वोट डालने जा रहे राज्य के अपने सभी युवा साथियों को मेरी विशेष बधाई। याद रखना है- पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2025
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपूर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.






