सिमरी : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेगुसरायमध्ये सर्वाधिक ६७.३२% मतदान झाले, तर शेखपुरा येथे सर्वात कमी ५२.३६% मतदान झाले. राजधानी पाटणा येथे ५५.०२% मतदान झाले.
५६ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहिले. बिहारमधील शहरी मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव होता. १२१ जागांपैकी तीन जागांवर सर्वात कमी मतदान झाले. राजधानी पाटणामधील शहरी भागात कुम्हरार येथे ३९.५२%, दिघा येथे ३९.१०% आणि बांकीपूर येथे ४०% मतदान झाले. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर, १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांवर १,३१४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील करण्यात आले. बिहारमधील २४३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
मुजफ्फरपूरमधील गायघाट विधानसभा मतदारसंघातील तीन बूथवर मतदान बहिष्कार टाकण्यात आला. बूथ क्रमांक १६१, १६२ आणि १७० वरील मतदारांनी ओव्हर ब्रिज आणि रस्ता बांधकामासाठी मतदान बहिष्कार टाकला. पहिल्या टप्प्यात दोन उपमुख्यमंत्र्यांसह १८ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्या टप्प्यात १० हॉट सीट्स असून ज्यामध्ये तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, अनंत सिंग यांच्यासह अनेक मोठ्या चेहऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सिमरी बख्तियारपूर, महिसी, तारापूर (मुंगेर जिल्हा) आणि जमालपूर येथे मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांवर दगडफेक, शेणफेक
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात लखीसरायमध्ये मोठा राडा झाला. राजदच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या कारला घेराव घालत त्यांच्या वाहनावर दगडफेक आणि शेणफेक केली. आरजेडी कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी लखीसराय एपीसींना फोन केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर टीका केली. लखीसरायच्या बूथ नंबर ४०४ आणि ४०५ कडे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. आरजेडीचे कार्यकर्ता मतदान प्रक्रियेत अडथळे आणत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. लखीसरायमध्ये एक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्यांच्या ताफ्यामधील वाहनांवर शेण फेकण्यात आले. यातून राजद पक्षाची मानसिकता कशी आहे, याचे हे दर्शन आहे, असं उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये विजय सिन्हा माध्यमांशी बोलत असताना काही लोकांनी सिन्हा यांच्या ताफ्याला अडवले. घोषणाबाजी करत आणि तेथे राडा घातला. आणखी एका व्हिडिओमध्ये काही लोक विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर शेण फेकत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.






