Thursday, November 6, 2025

बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार असून साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या सर्वाधिक चर्चेत असलेल्या जागा आहेत.

तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमदेवारांचे चेहरे बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे आहेत. यात सर्वात महत्त्वाची जागा राघोपूर आहे. राघोपूर येथे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या सतीश कुमार यादवांचे आव्हान आहे.

मोकामा मतदारसंघ ही सर्वाधिक चर्चेत असलेली दुसरी महत्त्वाची जागा आहे. दुलारचंद यादव यांच्या हत्येमुळे हा मतदारसंघ अत्यंत चुरशीच्या राजकीय संघर्षाचे केंद्र झाला आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अनंत सिंह आणि आरजेडीच्या वीणा देवी यांच्यात लढत आहे.

तारापूर मतदारसंघात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरजेडीचे अरुण कुमार यांच्यात सामना आहे. ही जागा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.

महुआ मतदारसंघात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव, आरजेडीचे मुकेश कुमार रोशन आणि लोक जनशक्ती पक्षाचे संजय सिंह यांच्यात चुरस होणार आहे.

तर पाचवा मतदारसंघ आहे अलीनगर. या ठिकाणी पहिल्यांदाच लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राजकारणातल्या अनुभवात नवीन असून थेट विधानसभेचे तिकीट दिल्यामुळे मैथिली ठाकूर चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यासमोर आरजेडीचे विनोद मिश्रा यांचे आव्हान आहे.

Comments
Add Comment