Thursday, November 6, 2025

श्वासात उतरलेली कृती, वृत्तीच्या वाटेवरून

श्वासात उतरलेली कृती, वृत्तीच्या वाटेवरून

ऋतुराज : ऋतुजा केळकर

“कर्म करावे निस्पृह भावे, फळाची आस नको रे ठावे। वृत्ती शुद्ध, अंतःकरण स्वच्छ, येतो मार्ग समाधानाचा सच्च।” माझ्याच कवितेच्या वहीतील या काव्याशी मी थांबले. कधी कधी मनात एकच प्रश्न घोळत राहतो समाधान नेमकं कुठे आहे? पैशात? लोकांच्या कौतुकात? की आपल्या कर्माच्या पवित्रतेत? जसं एखादं पान वाऱ्यावर हलकं डोलतं, तसं मनही या विचारांच्या झुळुकीत डोलत राहतं, कधी वाटतं, जे हवं ते मिळालं की मन शांत होईल. पण जे मिळालं त्यातच शांतता नसेल, तर ती शोधत राहणं हेच एक थकवा बनतं. कारण समाधान हे बाहेरच्या गोष्टींत नसतं ते आपल्या दृष्टिकोनात असतं. जसं एखादं झाड सावली देतं, पण त्यात कोण बसणार याची चिंता करत नाही, तसंच आपलं कर्म असावं निसर्गासारखं, सहज, नि:स्वार्थ.

कर्म करताना जर आपण फळाची अपेक्षा ठेवली, तर त्या अपेक्षेच्या सावलीतच आपलं समाधान हरवून जातं. पण जर कर्म निस्पृह भावे केलं, तर त्यात एक गूढ आनंद असतो, जो शब्दांत पकडता येत नाही, पण मनात खोलवर रुजतो, जर का आपण कृती करताना काही मागत नाही, तेव्हा कृतीच आपल्याला बरच काहीतरी देऊन जाते. एक शांतता, एक गूढ समाधान, जे शब्दात नाही, पण अस्तित्त्वात असतं. कारण, जेव्हा आपण फळाच्या अपेक्षेने कर्म करतो, तेव्हा मन सतत काहीतरी मोजत राहतं आणि मग त्यात मिळालं की काळजी, नाही मिळालं की खंत. पण, जेव्हा आपण केवळ प्रेमाने आणि कर्तव्य म्हणून कृती करतो ना तेव्हा त्या कृतीतूनच एक नवा प्रकाश उमटतो आपल्याच अंतर्मनात.

कधीकधी वाटतं, दुसऱ्याच्या मनात प्रकाश टाकावा, त्याच्या देखील वाटा उजळवाव्यात. पण प्रत्येक मनाचं दार वेगळं असतं, कधी उघडं, कधी बंद, कधी फक्त आतूनच दिसणारं. आपण मात्र आपला दीपक तेवत ठेवावा, त्याची वात नीट करावी, त्यात स्नेहाचे तेल भरावं, कारण आपली उजळलेली वाट हीच आपली खरी ओळख. अर्थात समोरच्याच्या मनाच्या दारावर आपली चाहूल पोहोचतेच असं नाही. दीपक ठेवला की प्रकाश उमटतो, पण अंधार दूर जाईलच असं नाही, कधी तो थांबतो, कधी झिरपतो, कधी मनातच घर करून बसतो. कस आहेना की, दीपक ठेवला की उजेड पसरतो, पण अंधार मागे हटेल की नाही, हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून असतं ना, म्हणूनच दुसऱ्याच्या पावलांचा ठसा आपल्यावर उमटावा, ही अपेक्षा ठेवली की मन थकायला लागतं. याचाच अर्थ असा की, आपली वृत्ती हीच आपली दिशा असावी. ती तयार होते, जेव्हा विचार फक्त डोळ्यांत नाही, तर श्वासात उतरतो.

अर्थात वृत्ती म्हणजे अंतःकरणाची दिशा. ती तयार झाली की कृती बदलते, कृती बदलली की अनुभव बदलतो. जसं एखादं झाड फुलतं, पण त्याच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय ते फुलत नाही तसंच मनाचं फुलणंही, त्या अंतःस्थ गाभ्याशी जोडलेलं असतं.पाण्याचा प्रवाह जसा वाट शोधत पुढे जातो... कोणी प्यायचं, कोणी न्हायचं याचा विचार न करता, तसंच आपली कृतीही असावी प्रवाही, निर्मळ आणि हेतुरहित. आपल्या मनाच्या खोल तळाशी एक दिशा असते ती वृत्तीची आणि वृत्ती उमटते तेव्हा जेव्हा, विचार केवळ जाणिवा बनतो, तेव्हा वृत्ती स्वतःच आकार घेते श्वासासारखी, निसरडी पण खोल. आपण जे शोधतो ते बाहेर नसतं ते आपल्या दृष्टिकोनात असतं. समाधान हे वस्तूंमध्ये नाही, तर त्या वस्तूंकडे पाहण्याच्या नजरेत असतं. कधी वाटतं, जे हवं ते मिळालं की मन थांबेल पण शांतता ही मिळवलेल्या गोष्टींत नसते, ती असते त्या क्षणात जेव्हा मन काही मागत नाही. पण जे मिळालं त्यातच शांतता नसेल, तर ती शोधत राहणं हेच एक थकवा बनतं. खरं समाधान हे त्या क्षणात असतं जेव्हा मनात काही मागणं नसतं, फक्त एक स्मरण असतं जसं एखादं गाणं, जे ऐकताना आपण विसरतो की, आपण ऐकत आहोत. त्या स्मरणाला एक सूर लागतो तो सूर म्हणजे नाम. नाम म्हणजे शब्द नव्हे, तर तो एक भाव असतो आणि भाव म्हणजे कृती नव्हे, तर शुद्धता. जेव्हा ही शुद्धता मनात रुजते, तेव्हा परमार्थ कठीण वाटत नाही तो सहजसाध्य होतो, जसा एखादा वारा, जो झाडाला हलवतो पण त्याला तोच हलवतोय हे माहीत नसतं. परमार्थ म्हणजे केवळ ग्रंथातलं तत्त्वज्ञान नव्हे, तो अनुभवण्याचा भाव असतो तो देखील शुद्ध वृत्तीच्या स्पर्शाने आणि ही वृत्ती टिकवण्यासाठी लागतो एकच आधार ते म्हणजे परमेश्वराचे स्मरण. अर्थात स्मरण म्हणजे केवळ आठवण नव्हे, तर एक सततचा जागर आहे. वही मिटता मिटता मला जे सुचलं ते असं,

शांततेच्या शोधात जेव्हा मागणं थांबतं... तेव्हा समाधान उमलतं ... अंतर्मनात, नि:शब्दपणे...

Comments
Add Comment