भाविकांची चेंगराचेंगरी

तीन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यात व्यंकटेश्वर मंदिरात एकादशीच्या पूजेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचे कारण अरुंद प्रवेशद्वार, बांधकाम चालू असलेला परिसर आणि प्रशासकीय हलगर्जीपणा असल्याचे मानले जात आहे. देव मंदिरात बाराही महिने असतो. तो कुठेही जात नाही. भक्त कधीही ये-जा करू शकतात, देव ‘भक्तीचा भुकेला’ असतो, अशी ही कल्पना आहे. तरीही यात्रा, एकादशी, तिथीला मंदिरांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण मिळविताना कोणत्याही भागातील प्रशासनावर मर्यादा पडणे स्वाभाविकच असते. उपलब्ध जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाली, की चेंगराचेंगरी होणे स्वाभाविकच आहे. त्यातून अफवा, पुढे जाण्याची घाई, गर्दीमुळे निर्माण झालेला उकाडा, श्वास घेण्यासाठी होणारा त्रास व त्यातून पळापळ प्रसंगी एकमेकांना अक्षरश: तुडवतच गर्दी मार्गक्रमण करत असते. त्यातून मृत्यूकांड होते. काही काळ हळहळ व्यक्त केली जाते. चर्चांना उधाण येते, काही दिवसांनी पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती त्या ठिकाणी पाहावयास मिळते.


ऑगस्ट २००३ मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. म्हणजे या घटना दक्षिण अथवा उत्तर भारतात घडतात, अशातला भाग नाही. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात २००५ साली मांढरदेवी येथील काळुबाई देवस्थानाच्या ठिकाणीही अशा प्रकारची चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत तर जवळपास ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू तर २५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमा मेळ्यानिमित्त काळुबाई मंदिरात लाखो भाविक जमतात. त्यावर्षी देवीला नारळ आणि बकरे अर्पण करण्यासाठी जवळजवळ दोन लाख लोक जमले होते, कोणीही अशा प्रकारची दुर्घटना घडावी अशी इच्छा केली नसती. मंदिरात फक्त स्टॉलने वेढलेल्या एका अरुंद गल्लीतून प्रवेश करता येतो. दुपारनंतर सुरू झालेल्या चेंगराचेंगरीमुळे, आतील गर्भगृहात जाणाऱ्या पायऱ्यांवर साचलेले नारळपाणी आणि दिव्याचे तेल निसरडे झाले. काही महिला पाय घसरून पडल्या आणि त्या तुडवल्या गेल्या. वरच्या विजेच्या तारा तुटल्या, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीनंतर एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने चेंगराचेंगरी झाली.


परवाच्या व्यंकटेश्वर मंदिरातील दुर्घटनेचा आढावा घेतला असता, त्या घटनेतही अन्य घटनांच्या तुलनेत फारसे वेगळे काही दिसत नाही. व्यंकटेश्वर मंदिरात एकादशीच्या पूजेनिमित्त मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. मंदिरात प्रवेश करण्याची व मंदिरातून बाहेर पडण्याची जागा अरुंद असून मंदिर परिसरात बांधकाम सुरू असल्याने ही दुर्घटना घडली. मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली, ज्यामुळे भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. एकादशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे. याच पवित्र दिवशी व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी जमले होते. मात्र, पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन भाविकांना आपला जीव गमावला. व्यंकटेश्वर मंदिरातील दुर्घटनेमुळे दक्षिण भारताला हादरा बसला असून अलीकडच्या काळात चेंगराचेंगरी, त्यातून घडणाऱ्या दुर्घटना आणि मृत्यूचे तांडव या घटना ठरावीक अंतरानी घडतच चालल्या आहेत.


व्यंकटेश्वर मंदिरात झालेली चेंगराचेंगरीची घटना या वर्षातील आंध्र प्रदेश राज्यातील तिसरी घटना आहे. ३० एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथील सिंहचलम मंदिरात पावसामुळे भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. ८ जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या विशेष दर्शनासाठी तिकिटे वाटप करण्यासाठी काउंटवर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच शेजारच्या तामिळनाडू राज्यात अभिनेता आणि आता राजकीय पक्षाचा नेता झालेल्या थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ४१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनीच आता आंध्रात ही दुःखद घटना घडली आहे. इंडियन प्रीमियर लीग’चे (आयपीएल) जेतेपद पटकावल्यानंतर जून महिन्यात ‘आरसीबी’ संघातील खेळाडूंच्या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने चिन्नास्वामी क्रीडांगणात केले होते. या वेळी क्रीडांगणाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५६ जण जखमी झाले. दिल्लीतील रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती, ज्यात अनेकजण जखमी झाले होते. नवी दिल्ली येथील रेल्वेस्थानकावर १५ फेब्रुवारी २०२५च्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत.


महाकुंभाला जाण्यासाठी हिंदू भाविकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळे प्रयागराजसह बिहार, उत्तर प्रदेशातील स्थानके आणि आता नवी दिल्ली येथे फलाटांवर गर्दी ओसंडून वाहत आहे. गर्दीचे नियंत्रण करणे कोणत्याही प्रशासनाला सध्या शक्य होत नाही, असे लक्षात येते. चेंगराचेंगरीमुळे मृत्यूचे होणारे तांडव अलीकडच्या काळात ठरावीक कालावधीनंतर घडतच आहे. अशा घटनांना आळा बसणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यावर दुर्घटना होणे स्वाभाविकच आहे. अशा घटनांना आवर घालणे काळाची गरज आहे. कोणतेही प्रशासन गर्दीला नियंत्रणात आणू शकत नाही. त्यामुळे लोकांनीच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले तरच अशा घटनांना पूर्णविराम बसेल. महाराष्ट्रातील पंढरपूरात तर आषाढीचा भाविकांचा महापूर लोटतो. विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरात येतात. पण सर्व काही शिस्तबद्ध असते. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी लाखो भाविक एकाचवेळी असतात. भाविक रांगेत दर्शन घेतात. पण तिथे चेंगराचेंगरी नसते. लाखो भाविक येऊन विठूरायाच्या पंढरीत चेंगराचेंगरी होत नाही, याचे इतर ठिकाणी गर्दी करणाऱ्या भाविकांनी अनुकरण करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

जगज्जे‘त्या’

१९८३ साली भारताच्या पुरूष संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. १९८३ साली त्या वेळी बहुतेकांकडे टीव्ही नव्हते. पण तो

संधीसाधूंचा मोर्चा

महाराष्ट्रातील विरोधकांनी काल मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवरून महापालिका कार्यालयापर्यंत सत्याचा मोर्चा काढला.

भलतं दु:साहस

एखाद्या इंग्रजी चित्रपटाचं कथानक वाटावं असं ओलीसनाट्य गुरुवारी मुंबईतल्या पवईच्या आर ए स्टुडिओमध्ये घडलं.

डिजिटल अरेस्टचे बळी

‘डिजिटल अरेस्ट' नांवाने विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सुरू असलेल्या एका मोठ्या रॅकेटमुळे पुण्यात एक

कर्मचाऱ्यांना अच्छे दिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सत्तेवर येताना आपण देशवासीयांसाठी अच्छे दिन आणू अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार

निम्म्या देशाची छाननी

देशातल्या एकूण मतदारांपैकी साधारण निम्म्या मतदारांच्या मतदार याद्यांतील नोंदींची सखोल छाननी निवडणूक आयोगाने