कॉलेजबाहेर गोंधळ, वडिलांना मारहाण; अपमान असह्य झाल्याने २० वर्षीय ऋचा पाटीलची टोकाची भूमिका!
मनवेलपाड्यात थरार, ५ आरोपी गजाआड
विरार : विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथील शिव शंभो अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. ऋचा पाटील नावाच्या या बी.कॉम.च्या विद्यार्थिनीला प्रेमसंबंधातून झालेल्या ब्लॅकमेलिंग आणि कॉलेजबाहेरील अपमानामुळे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे उघड झाले आहे. या प्रकरणात विरार पोलिसांनी एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.
ऋचाचे विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अमित दिनेश प्रजापती नावाच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध होते, पण ते तुटले होते. मात्र ब्रेकअपनंतरही अमित ऋचाला सतत ब्लॅकमेल करत होता. या त्रासातून तिची सुटका होत नव्हती. घटनेच्या दोन दिवस आधी कॉलेजमध्ये दोघांमध्ये वाद झाला. ऋचा कॉलेजमधून बाहेर पडत असताना, अमितचा मित्र शिवा प्रल्हाद मदेसिया याने तिला अडवले आणि अमितचे म्हणणे मान्य करण्यासाठी दबाव टाकला. यामुळे त्यांच्यातही जोरदार वाद झाला.
या सर्व त्रासाची माहिती ऋचाने आपल्या वडिलांना दिली. १३ ऑक्टोबर रोजी ऋचा आणि तिचे वडील प्राचार्यांकडे तक्रार करण्यासाठी गेले, पण प्राचार्य उपस्थित नव्हते. याचवेळी अमित प्रजापती, शिवा, राकेश पाल, कृष्णा गुप्ता, एक अल्पवयीन मुलगी आणि अन्य दोन तरुण कॉलेजच्या आवारात पोहोचले. ऋचाच्या वडिलांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, या टोळक्याने ऋचाबद्दल उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या वडिलांनी अमितला कानाखाली मारली. यानंतर तिथे मोठा गोंधळ झाला आणि आरोपींनी ऋचा आणि तिच्या वडिलांना शिवीगाळ करत, थेट वडिलांना मारहाण केली.
कॉलेजबाहेर झालेल्या या अपमानास्पद आणि मारहाणीच्या घटनेमुळे ऋचा पूर्णपणे खचून गेली. ती वडिलांना घेऊन घरी आली आणि त्यानंतर काही वेळातच तिने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले.
पोलिसांनी या प्रकरणात एकूण ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमित प्रजापती, शिवा मदेसिया, राकेश पाल आणि कृष्णा गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवले आहे. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध विरार पोलीस सध्या घेत आहेत.
या घटनेने महाविद्यालयीन प्रेमसंबंधांमधील धोक्याचा आणि ब्लॅकमेलिंगच्या गंभीर परिणामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






