सिंधुदुर्गच्या प्रभारीपदी मंत्री नितेश राणे तर निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार यांची निवड
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक-२०२५ आणि जिल्हा निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र स्तरावर संघटनात्मक नियुक्त्यांची मोठी घोषणा केली आहे. पक्षाने विविध जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या नियुक्त्यांमध्ये प्रामुख्याने सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, पालघर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि सातारा यासह एकूण ३५ संघटनात्मक जिल्ह्यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्गसाठी निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद जठारतर निवडणूक प्रभारी म्हणून मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहर निवडणूक प्रमुख म्हणून विनय नातू तर रत्नागिरी दक्षिणची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर निरंजन डावखरे यांची दोन्ही विभागांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे शहर : संजय केळकर हे निवडणूक प्रमुख तर गणेश नाईक हे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नाशिक शहर आणि उत्तर : नाशिक शहरसाठी राहुल ढिकले आणि नाशिक उत्तरसाठी राहुल आहेर यांची निवड करण्यात आली असून, जिल्ह्याच्या प्रभारीपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पुणे शहर आणि पुणे उत्तर (बारामती) साठी अनुक्रमे गणेश बिडकर आणि महेश लांडगे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.पुणे विभाग आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक तयारीचे प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ हे काम पाहणार आहेत.
अहमदनगर : अहमदनगर शहर, उत्तर आणि दक्षिणसाठी श्रीमती मेधा विधाते, डॉ. संजय रिठे पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापूर शहर आणि सोलापूर दक्षिणसाठी सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह जयकुमार गोरे हे प्रभारी असतील.सातारा: सातारा जिल्ह्याच्या प्रभारीपदी शिवेंद्रराजे भोसले यांची नियुक्ती झाली आहे.
या यादीमध्ये अनुभवी नेत्यांसह अनेक तरुण नेत्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामुळे भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट होते. या नियुक्त्यांच्या माध्यमातून पक्षाने निवडणुकीची मजबूत संघटनात्मक बांधणी सुरू केल्याचे दिसत आहे.






