Wednesday, November 5, 2025

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा काळाच्या पडद्याआड! पाहा, हिंदुजा यांच्या नावावर किती संपत्ती आहे?

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा काळाच्या पडद्याआड! पाहा, हिंदुजा यांच्या नावावर किती संपत्ती आहे?

लंडन: भारतीय वंशाचे ब्रिटिश अब्जाधीश आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ८५व्या वर्षी लंडनच्या एका रुग्णालयात हिंदुजा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गोपीचंद हिंदुजा यांच्या नेतृत्वात हिंदुजा समूहाने तेलापासून ते ऑटोमोबाईलपर्यंतच्या विशाल व्यवसाय साम्राज्यात नवीन उंची गाठली.

मोठा भाऊ श्रीचंद हिंदुजांच्या निधनानंतर मे २०२३ मध्ये गोपीचंद हिंदुजा यांनी हिंदुजा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी सलग सात वर्षे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला होता. भारतीय कंपनीला जागतिक स्तरावर नेणाऱ्या गोपीचंद हिंदुजांचा 'हिंदुजा' समुह ऑटोमोबाईल्स, बँकिंग, रसायने, ऊर्जा, मीडिया आणि रिअल इस्टेटसह विविध व्यवसायांसाठी महत्त्वाचा आहे.

१८ मे, २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, गोपीचंद हिंदुजाच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ३३,६७,९४८ कोटी रुपये होती. हि रक्कम दुसऱ्या क्रमांकावरील डेव्हिड आणि सायमन रुबेन कुटुंबापेक्षा ८,०४२ कोटी रुपये जास्त होती. त्याचवेळी, फोर्ब्सच्या रिअल टाइम नेट वर्थनुसार मंगळवारपर्यंत हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १,८२,६६८ कोटी रुपये होती.

हिंदुजा कुटुंबाकडे लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट होल्डिंग्ज आहेत. ज्यामध्ये व्हाइटहॉलमधील ऐतिहासिक ओल्ड वॉर ऑफिस बिल्डिंगमध्ये असलेल्या रॅफल्स लंडन हॉटेलचा समावेश आहे. हिंदुजा समुह सुरुवातीला एक व्यापारी कंपनी होती जी भारत आणि इराणमधील वस्तूंच्या व्यापारात गुंतलेली होती. त्यानंतर हळूहळू, या समुहाचा विस्तार तेल, ऑटोमोबाईल्स आणि वित्त यासारख्या क्षेत्रांमध्ये झाला. त्यांच्या या व्यवसाय विस्तारातील जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांनी एवढी संपत्ती मिळवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >