भिगवण : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. तशी चर्चा भोर तालुक्यात जोर धरत आहे. अलीकडेच तालुक्यातील नेते यशवंत माने आणि प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भिगवण–शेटफळगढे जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचालींना वेग आला असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्तरावर अनेक सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मातब्बर नेते हे अपक्ष स्वरूपात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे.
या चर्चेनंतर भरणे गटात जाण्याच्या तयारीत असणाऱ्या काही स्थानिक नेत्यांनी 'वेट अँड वॉच ' असा पवित्रा घेतला आहे. ते मंत्री पाटील काय निर्णय घेतात यावर लक्ष ठेऊन आहेत. मंत्री पाटील यांचा प्रभाव इंदापूर तालुक्यात आजही आहे. त्यांच्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हर्षवर्धन पाटील यांच्या संभाव्य निर्णयाने इंदापूरच्या सत्तासमीकरणात मोठा बदल घडू शकतो. त्यांच्या अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे भाजपला बळकटी मिळेल, राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढेल, अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे.






